जळगाव प्रतिनिधी । भारतीय संविधानाने दिलेल्या मानवी हक्कांमुळे सर्व स्तरातील माणसांना त्यांचा आत्मसन्मान मिळाला. सार्वजनिक जीवनात वावरतांना त्याला स्वाभिमानाने जगण्याची ऊर्जा प्राप्त झाली. देशाच्या सर्वांगीण प्रगतीमध्ये भारतीय संविधानातील मानवी हक्कांचे मोल अत्युच्च आहे असे मत प्रा. राजीव पवार यांनी व्यक्त केले. मू.जे. महाविद्यालयात मानव्यविद्याशाखेच्या वतीने मानवी हक्क दिनानिमित्त आयोजित केलेल्या व्याख्यानात ते बोलत होते.
याप्रसंगी प्रा. जितेंद्र पेंढारकर यांनीदेखील आपल्या व्याख्यानातून मानवी हक्कांची जाणीव उपस्थित विद्यार्थ्यांना करून दिली. डॉ. जयेश पाडवी यांनी सर्वसामान्य भारतीय माणसाच्या आयुष्यात संविधानाने बहाल केलेल्या मानवी हक्कांमुळे झालेल्या परिवर्तनाचे विवेचन केले. या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रा. संजय हिंगोणेकर लिखित ‘सीक्रेट अजेंडा’ या काव्यसंग्रहाच्या वाटपाने करण्यात आले. प्रास्ताविक राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. संजय हिंगोणेकर यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाषा प्रशाळा संचालक प्रो. भूपेंद्र केसूर होते. अध्यक्षीय मनोगतात ते म्हणाले, मानवी हक्कांचा जाहीरनामा म्हणजे क्रांतिकारक दस्ताऐवज आहे. याचा आदर, पालन प्रत्येक व्यक्ती समूहराष्ट्राने केले पाहिजे. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक शास्त्रे प्रशाळेचे संचालक प्रा.देवेंद्र इंगळे उपस्थित होते. कार्यक्रमाला बहुसंख्येने प्राध्यापक व विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. कुणाल वानखेडे व आभारप्रदर्शन प्रा. राहुल सुरळकर यांनी केले.