फैजपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत श्री खंडेराव महाराज यांचा जन्मदिवस विविध धार्मिक अनुष्ठान द्वारे साजरा करण्यात आला. यात रावेर, यावल तालुक्यातील स्वामी समर्थ केंद्रातून हजारो सेवेकरी आज सकाळपासूनच खंडेराव देवस्थानात उपस्थित होत्या. यात मल्हारी याग, मल्हारी सप्तशती पाठ, होम हवन, तळी भरणे, खंडेरावाचा मान सन्मान करून महाआरती करण्यात आली.
कार्यक्रमानंतर वांग्याचे भरीत, भाकरी, कांदा, मुळा, यांचा नैवेद्य अर्पण करून उपस्थित भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. कार्यक्रमाचे सर्व नियोजन खंडेराव देवस्थानचे गादीपती महामंडलेश्वर पुरुषोत्तम दासजी महाराज, उत्तराधिकारी पवनदासजी महाराज, राम मनोहरदास, कन्हैया महाराज आमोदे यांनी केले. कार्यक्रमाला सतपंथ मंदिर संस्थांचे गादीपती तथा अखिल भारतीय संत समितीचे खजिनदार महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी सांगितले की, खंडेरायाची हजार महिलांनी केलेली उपासना आराधना नक्कीच आपल्याला फळ देईल. श्री खंडेरायाच्या सामूहिक सप्तशती उपासनेचे खूप महत्त्व असून भविष्यात आपल्या परिवारासाठी तसेच देशासाठी फलदायी असेल. या कार्यक्रमाला स्वामी समर्थ केंद्रातील सेवेकरी तसेच परिसरातील हजारो भाविक भक्तांनी उपस्थिती दिली. खंडेराव देवस्थान कार्यकर्ते तथा श्री स्वामी समर्थ केंद्रातील कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले.