अगा जे ‘साताऱ्यात’ घडलेची नाही…वृत्तात कसे आले..?

jc8kolng evm and vvpat 625x300 20 March 19

सातारा, वृत्तसंस्था | लोकसभा पोटनिवडणूक आणि कोरेगांव विधानसभा निवडणुकीच्या मतदानादरम्यान सोमवारी (दि.२१) मतदान केंद्र क्रमांक २५० नवलेवाडी येथे ईव्हीएममध्ये बिघाड होऊन कोणत्याही उमेदवारासमोरील बटण दाबल्यास मत कमळाला अर्थात भाजपाच्या उमेदवाराला जात असल्याचे वृत्त स्थानिक ग्रामस्थांच्या हवाल्याने माध्यमांमधून प्रसिद्ध झाले होते. मात्र, साताऱ्यातील संबंधीत मतदान केंद्रावर असे काहीही घडलेले नाही, असे स्पष्टीकरण निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिले आहे.

 

निवडणूक निर्णय अधिकारी, २५७ कोरेगाव, विधानसभा मतदार संघ तसेच कोरेगांवच्या उपविभागीय अधिकारी किर्ती नलावडे यांनी याबाबत खुलासा करताना सांगितले की, २१ ऑक्टोबर २०१९ रोजी सकाळी ५.३० वाजता मतदान केंद्र क्रमांक २५० नवलेवाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रतिनिधी दीपक पवार आणि दिलीप वाघ हे अभिरुप मतदानावेळी उपस्थित होते. अभिरुप मतदानावेळी व्हीव्हीपॅट मतदान चिठ्ठीच्या मुद्रणाबाबत दोन्ही प्रतिनिधींनी आक्षेप घेतला नाही. किंबहुना सकाळी ७.०० ते दुपारी ४.०० वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सूर असताना कोणत्याही मतदारांनी असा आक्षेप घेतला नाही. दीपक पवारांनी दुपारी असा आक्षेप घेतल्यानंतर त्यांना संबंधित केंद्राध्यक्षांनी चाचणी मतदानासाठी जोडपत्र १५ भरुन देण्यास सांगितले. मात्र, त्यांनी तसे करण्यास नकार दिला. त्यानंतर संबंधीत मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया सुरळीतपणे सुरु होती. त्यामुळे या तक्रारींमध्ये कोणतेही तथ्य नाही, तसेच अशी कोणतीही घटना घडलेली नाही.

Protected Content