मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी मोठी तयारी सुरू केली आहे. तर दुसरीकडे गेल्या काही महिन्यांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन सुरू केले आहे. जरांगे पाटील यांनी ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली असून या मागणीला ओबीसी नेत्यांनी विरोध केला आहे. विधानसभा निवडणुकीत जरांगे पाटील यांनी उमेदवार उभा करणार असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, आता ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनीही २८८ उमेदवार उभे करणार असल्याचे जाहीर केले आहे.
ओबीसी नेते प्रकाश शेंडगे आज मुंबईत होते. यावेळी त्यांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ओबीसी बहुजन पार्टी राज्यात २८८ उमेदवार उभे करणार असल्याचं जाहीर केले. प्रकाश शेंडगे म्हणाले, ओबीसी बहुजन पार्टीचे राज्यातील नेते आज मुंबईत बैठकीसाठी उपस्थित होते. या बैठकीत आम्ही विधानसभा निवडणुका लढवणार असल्याचं ठरलं आहे. आरक्षणाची लढाई आम्ही मतपेटीतून लढवण्याचं ठरवले आहे. प्रत्येक जिल्ह्यातून उमेदवार देणार असून प्रत्येक जातीला प्रतिनिधीत्व मिळणार आहे, असेही शेंडगे म्हणाले.