पाच राज्यांमधील निवडणुकांच्या मतमोजणीस प्रारंभ

नवी दिल्ली वृत्तसंस्था । देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसह लोकसभा व विधानसभेच्या पोटनिवडणुकांसाठी झालेल्या मतदानाची मोजणी आज सकाळपासून सुरू झाली असून यात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पश्‍चीम बंगाल, तामीळनाडू, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरी या पाच राज्यांमध्ये विधानसभेसाठी अलीकडेच मतदान झाले होते. याची मतमोजणी आज सकाळी आठ वाजेपासून सुरू झाली आहे. पहिल्यांदा पोस्टल मतांची मोजणी करण्यात येणार असून नंतर विविध फेर्‍यांमध्ये मतमोजणी होणार आहे.

यातील पश्‍चीम बंगालच्या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. दोन वेळेस प्रचंड मताधिक्याने विजयी झालेल्या ममता बॅनर्जी यांना या वेळेस भाजपने अतिशय तगडे आव्हान उभे केले आहे. यामुळे यंदाच्या निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली आहे. दोन्ही बाजूंनी प्रचारात एकमेकांवर प्रचंड टीका केली. मतदान झाल्यानंतर जाहीर करण्यात आलेल्या एक्झीट पोलमध्ये बहुतांश संस्थांनी ममतांना यश मिळणार असल्याचे सांगितले असले तरी येथे त्रिशंकू स्थिती होण्याची शक्यताही सांगण्यात आली आहे. तर एका संस्थेने भाजप सत्तेवर येणार असल्याचे भाकित केले आहे. यामुळे आता येथे नेमके कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तामिळनाडूतही या वेळेस तगडी फाईट होण्याची शक्यता आहे. अर्थात सत्ताधारी एआयएडीएके आणि त्यांचा पारंपरीक प्रतिस्पर्धी डीएमके यांच्यात हा सामना रंगणार असून यात डीएमकेच्या विजयाची शक्यता एक्झीट पोलने वर्तविली आहे. आसाममध्ये विद्यमान राज्य सरकारची कामगिरी फारशी समाधानकारक नसली तरी तेथे भाजपच बाजी मारण्याचे एक्झीट पोलने दर्शविले आहे. केरळमध्ये डावी आघाडी पुन्हा सत्तेवर येण्याची शक्यता असून पुद्दुचेरीत भाजप मित्रपक्षांसह सरकार बनविण्याचे सांगण्यात आले आहे.

दरम्यान, याच्याच सोबतीला दोन लोकसभा जागांसह विधानसभेच्या पोटनिवडणुकांचा निकाल देखील आजच लागणार आहे. यात महाराष्ट्रातील पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. येथे राष्ट्रवादीचे भगिरथ भालके आणि भाजपचे समाधान अवताडे यांच्यात अतिशय चुरशीचा मुकाबला होण्याची शक्यता आहे. तर मराठी भाषिक लोकसंख्या जास्त असणार्‍या बेळगाव लोकसभा मतदारसंघातही पोटनिवडणूक झाली आह. तेथे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी संजय राऊत गेल्याने रंगत चढली होती. अर्थात, तेथे खरा मुकाबला हा भाजप व काँग्रेसमध्ये असला तरी एकीकरण समितीचा उमेदवार कुणाची आणि किती मते घेतो यावर निकाल लागणार असल्याचे तज्ज्ञांनी मत व्यक्त केले आहे.

Protected Content