ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी स्थापन केला नवीन ‘ओबीसी बहुजन पक्ष’

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी नव्या पक्षाचे नाव जाहीर केले आहे. ‘ओबीसी बहुजन पार्टी’ असं त्यांच्या पक्षाचं नाव असेल. ओबीसींच्या आरक्षणाच्या रक्षण करण्यासाठी नवा पक्ष स्थापन करत असल्याचं शेंडगे यांनी म्हटलं आहे. पक्षाचा झेंडा हा पिवळ्या रंगाचा आहे, तर चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस असेल.

मराठा आरक्षणाचा वादळ सध्या महाराष्ट्रावर घोंघावत आहे. त्यांना आरक्षण देण्यासाठी ओबीसी समाजावर घाला घालण्याचं पाप करण्यात आलंय. सत्तेचा वापर ओबीसी समाजाच्या आरक्षणावर घाला घालण्यासाठी करण्यात आला. महाराष्ट्राची सत्ता हस्तगत करण्याचे राज्यातील ओबीसी भटके समाजाने ठरवलं आहे. त्यामुळे आता पक्ष स्थापन करण्यात आलाय, असं शेंडगे म्हणाले.

भटक्या विमुक्त यांना न्याय देणं हे आमचं पहिलं उद्दिष्ट्य असेल. तिकिटासाठी ज्यांना खेपा घालाव्या लागत होत्या त्यांना आता खेपा घालाव्या लागणार नाहीत. 48 लोकसभा आणि 288 विधानसभा मतदार संघात ओबीसी, भटके, विमुक्त उमेदवार देण्यात येतील, असं ते म्हणाले.

शेंडगे यांनी यावेळी मंत्री छगन भुजबळ यांच्याविषयी देखील भाष्य केलं. हा पक्ष स्थापन करत असताना आम्ही त्यांचा आशीर्वाद घेतला आहे. जेव्हा केव्हा ते बाहेर पडतील तेव्हा तेच आमचे नेते असतील हे निश्चित आहे. आज सत्तेत ओबीसी बाजूने लढणारे एकमेव नेते ते आहेत. जोवर सरकार आहे तोवर सरकार मध्ये राहून त्यांनी संघर्ष करावा आणि आपली बाजू मांडावी, असं ते म्हणाले.

Protected Content