नाशिकमध्ये हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीवरून ओबीसी समाज आक्रमक

नाशिक-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | अनेक दिवसांपासून नाशिक लोकसभा मतदारसंघाचा तिढा सुटत नव्हता. महायुतीतील भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या तिन्ही पक्षात रस्सीखेच सुरू होती. शेवटी शिवसेना शिंदे गटाने ही जागा आपल्याकडे राखत खासदार हेमंत गोडसे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट छगन भुजबळ हे देखील नाशिकच्या जागेसाठी इच्छूक होते, परंतू त्यांनी माघार घेतली. त्यामुळे भाजपने देखील या जागेवर आपला दावा ठोकला होता. छगन भुजबळ यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे मतदारसंघातील ओबीसी समाज नाराज झाला आहे.

हेमंत गोडसे यांना उमेदवारी मिळाल्यामुळे ओबीसी समाजाने विरोध दर्शविला आहे. ओबीसी समाजाकडून नाशिकमध्ये ‘आता तरी उठ ओबीसी जागा हो!!’ असे मजकूर असलेले होर्डीग्स लावण्यात आलेले आहे. आम्ही ७० टक्के ओबीसी आहोत तरीही तिकीट मिळाले नाही. ओबीसी समाजाच्या या भूमिकेमुळे हेमंत गोडसे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. यासोबतच भाजप नेते दिनकर पाटील हे हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीमुळे नाराज आहे. दिनकर पाटील हे भाजपकडून नाशिकच्या उमेदवारीसाठी इच्छूक होते. पण महायुतीत ही जागा शिवसेना शिंदे गटाला मिळाल्यामुळे नाशिकमधील भाजपचे ओबीसी नेते नाराजी व्यक्त करत आहे.

महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे हेमंत गोडसे, महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे, वंचित बहूजन आघाडीकडून मराठा नेते करण गायकर, तर दुसरीकडे ठाकरे गटाचे नेते विजय करंजकर यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यासोबतच जय बाबाजी भक्त परिवाराचे शांतीगिरी महाराज अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहे. त्यामुळे नाशिक लोकसभा मतदारसंघाची निवडणूक संपूर्ण महाराष्ट्रात लक्षवेधी ठरणार आहे.

Protected Content