आता घंटागाड्यांना लागणार लाल डस्टबीन; यात घातक कचरा टाकण्याचे महापौर-उपमहापौरांचे आवाहन (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी | स्वच्छ भारत अभियानातील घातक कचरे से आझादी या उपक्रमाच्या अंतर्गत आज शहरातील हरिविठ्ठल नगर परिसरात आज महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यात महापौर, उपमहापौर व अतिरिक्त आयुक्तांनी मार्गदर्शन करतांना घातक कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी शहरातील घंटागाड्यांना लाल डस्टबीन लावण्यात येणार असून याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले.

याबाबत वृत्त असे की, शहरातील हरिविठ्ठल नगर परिसरात आज स्वच्छ भारत अभियानाच्या अंतर्गत असणार्‍या घातक कचरे से आझादी या उपक्रमांच्या अंतर्गत महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यात महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील व अतिरिक्त सहायक आयुक्त वर्षा गायकवाड यांनी उपस्थित महिलांना कचरा विलगीकरण आणि याची विल्हेवाट लावण्याबाबत मार्गदर्शन केले. जळगाव शहर हे स्वच्छ व सुंदर करण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत असून महिलांनी याला सहकार्य करण्याचे आवाहन याप्रसंगी मान्यवरांनी केले. तर सर्व महिलांनी स्वच्छता कायम राखण्याचा संकल्प देखील घेतला.

या संदर्भात उपमहापौर कुलभूषण पाटील म्हणाले की, स्वच्छ अभियानाच्या अंतर्गत आज आयोजीत करण्यात आलेल्या मेळाव्याला परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून चांगला प्रतिसाद दिला आहे. महिलांनी घातक कचरा हा काळीजपूर्वक वेगळा करून विल्हेवाट लावण्यासाठी प्रशासन आता व्यवस्था करत असून यानुसार कचरा वेगळा करून टाकावा. आणि यातून आपले शहर हे स्वच्छ आणि सुंदर राखण्यासाठी वाटा उचलावा असे आवाहन उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी केले.

तर अतिरिक्त सहायक आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी घरातील घातक कचरा जसे की सॅनिटरी नॅपकीन, मुदत संपलेली औषधी, इंजेक्शन्स, मुलांचे डायपर आदी वस्तू वेगळ्या करण्याची गरज आहे. हा कचरा आता आपल्याकडे येणार्‍या घंटागाडीत नव्याने लावण्यात आलेल्या लाल डस्टबीनमध्ये टाकायचा आहे. यामुळे घातक कचर्‍यापासून होणार्‍या परिणामांना आळा घालता येईल. सर्व महिलांनी याला सहकार्य करण्याचे आवाहन देखील त्यांनी केले. तर महापौरांनी जळगाव शहर हे आपल्याला प्रगतीपथावर नेण्याचे असून यासाठी स्वच्छता हा सर्वात महत्वाचा घटक असल्याचे नमूद केले. शहरात स्वच्छता राखण्याचे काम करून महिलांनी प्रशासनाच्या प्रयत्नांना हातभार लावण्याची आवश्यकता असल्याचे डॉ. विद्या गायकवाड म्हणाल्या.

Protected Content