माळी समाजाच्या मेळाव्यात 431 विवाहेच्छुकांनी दिला परिचय (व्हिडीओ)

Mali samaj news

जळगाव, प्रतिनिधी । येथील श्री संत सावता माळी प्रतिष्ठान आणि समस्त माळी समाज पंच मंडळातर्फे रविवार 15 रोजी सरदार वल्लभभाई पटेल लेवा भवनात उपवर वधू-वर परिचय मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. मेळाव्यात 431 विवाहेच्छूकांनी परिचय करुन दिला.

कार्यक्रमाची सुरुवात प्रतिष्ठानचे सोमनाथ महाजन यांच्या शंखनादाने झाली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन आणि दीपप्रज्ज्वलन करण्यात आले. विवाहेच्छूंच्या परिचय पुस्तिकेचेही प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते व्यासपीठावर झाले. दरवर्षाप्रमाणे यंदाही माळी समाज वधू-वर परिचय मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. त्याप्रसंगी व्यासपीठावर लेखिका व कवयित्री प्रा.विजया मारोतकर (नागपूर), मनिषा महाजन, भाजपा ओबीसी मोर्चाच्या प्रदेश सचिव शालिनी बुंधे (संभाजीनगर), शिवसेना जिल्हा संघटक गुलाबराव वाघ, संचालक मंडळाचे अध्यक्ष विजय महाजन, उपाध्यक्ष जयंत इंगळे, सचिव शरद मोरे आदी उपस्थित होते.

मुलींनी सुखी संसारासाठी आईचा आर्दश घ्यावा – प्रा.विजया मारोतकर
मुलींची आई ज्याप्रमाणे अनेक वर्षांपासून आपला संसार गुण्यागोविंदाने सांभाळत आहे, तो आदर्श घेवून मुलींनी आपला संसार साभाळावा, असे प्रतिपादन प्रमुख वक्त्या प्रा.विजया मारोतकर यांनी केले. तसेच त्यांनी ‘पोरा जरा जपून’ याविषयार मार्गदर्शन करताना सांगितले की, मुलींनी मोबाईल कसा वापरावा, मुलींच्या कपड्यांविषयी सागताना अश्लिलता नको असे त्या म्हणाल्या. समाजात मुलांचे व्यवसाधीन होण्याचे आणि मुलींचे घरातून निघून जाण्याचे प्रमाण वाढले आहे. मुलींची सुरक्षतेची जबाबदारी मुलांची आहे. पती-पत्नीची जबाबदारीने कुटुंब व्यवस्था टिकवता येते. सहनशीलता आणि समजंसपणा दोघांमध्ये असणे गरजेचे असल्याचे त्या म्हणाल्या.

घर सांभाळणारी समजूदार असल्यास प्राधान्य
या निःशुल्क मेळाव्यात अनेक तरुणींनी उच्चशिक्षित, निर्व्यसनी, शाकाहारी, मनमिळावू, प्रेमळ, समजावून घेणारा जोडीदार, वास्तव समजून असणारा असावा, अशी अपेक्षाही व्यक्त केली. तसेच तरुणांपैकी अनेकांनी सुसंस्कृत, प्रेमळ तसेच घर सांभाळणारी समजूदार असल्यास प्राधान्य इ. अपेक्षा व्यक्त केल्या.

7 वर्षापासून प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी हा उपक्रम सातत्याने राबवत असून त्यातून अनेक विवाहही जुळून आले आहेत. मेळाव्यात माळी समाजातील सर्व पोटशाखा, जिल्ह्यातील सर्व पंच मंडळे, जिल्हा माळी समाजातील विविध संघटना, संस्था, मंडळांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमासाठी वाय. एस. महाजन, धनराज माळी, डी. बी. महाजन, मनोज सावंत आदींनी सहकार्य केले. यावेळी धरणगाव, पारोळा, भडगाव, चाळीसगाव, अमळनेर, चोपडा, जामनेर तसेच मध्यप्रदेश, गुजरात येथूनही समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाय.एस.महाजन यांनी तर सूत्रसंचालन डी.बी.महाजन यांनी केले. आभार उपाध्यक्ष जयंत इंगळे यांनी मानले.

लेवा भवनात भव्य मंडपात झालेल्या या कार्यक्रमात व्यासपीठाच्या डाव्या बाजूला वधू-वरांसाठी खुर्च्याची, उजवीकडे मान्यवर पाहुण्यांसाठी बैठक व्यवस्था होती. तसेच आवश्यक सुविधा पुरविण्यासाठी स्वयंसेवकही सज्ज होते. दूरवरुन आलेले समाजबांधव व दिवसभर चालणारा कार्यक्रम लक्षात घेऊन प्रवेश शुल्क भरलेल्यासांसाठी भोजन, चहापान, अ‍ॅक्वा वॉटरची व्यवस्था करण्यात आली होती. अर्थात दानशूर व्यावसायिक, उद्योजक व समाजबांधवांनी या व्यवस्था केल्या होत्या. त्यांचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख सूत्रसंचालकांनी करुन दिला. 5 युवक आणि नंतर 5 युवती अशा रितीने मंचावर स्वपरिचयासाठी पाचारण करण्यात येत होते. ते वधूवर सूचीतील आपला अनुक्रमांक, नाव, गाव, जन्मतारीख- वेळ, शिक्षण, कौटुंबिक पार्श्वभूमी, नोकरी-उद्योग, व्यवसाय, छंद, आवडीनिवडी, जोडीदाराबाबत अपेक्षा इ. निवेदन करीत होते. लेवा भवन परिसर दिवसभर समाजबांधवांच्या वर्दळीने आणि वाहनांच्या दाटीने गजबजला होता. प्रवेशद्वारानजिक नोंदणी कक्ष होते. जिल्ह्याभरातून समाजबांधव यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content