आता मातृभाषेत मिळणार इंजिनिअरिंगचे शिक्षण !

नवी दिल्ली । अता मराठीसह देशातील आठ भाषांमध्ये इंजिनिअरिंगचे शिक्षण घेता येणार असून अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदे म्हणजेच एआयसीटीईने याला परवानगी दिली आहे.

अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) नव्या शैक्षणिक वर्षापासून महाविद्यालयांना मराठीसह ८ भारतीय भाषांत अभियांत्रिकी म्हणजे इंजिनीअरिंगची पदवी प्रदान करण्याची परवानगी दिली आहे. यात मराठीसोबत हिंदी, बंगाली, तेलुगू, तामिळ, गुजराती, कन्नड व मल्याळम या भाषांचा समावेश आहे.

अनेक प्रगत देशांत तेथील अधिकृत भाषेतच अभियांत्रिकीचे शिक्षण दिले जाते. त्यानुसार भारतातही मराठीसह ८ प्रादेशिक भाषांत हे शिक्षण देण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. एआयसीटीई या सर्वच भाषांतील अभ्यासक्रमासाठी सामग्री उपलब्ध करवून देत आहे. तसेच स्वयंम व मॅसिव्ह ओपन ऑनलाइन कोर्स (एमओओ) पोर्टल अंतर्गत शिकवण्यात येणार्‍या अभ्यासक्रमांचेही भाषांतर करत आहे. भविष्यात आणखी ११ भाषांतून इंजिनीअरिंगच्या पदवी अभ्यासक्रमांचे शिक्षण उपलब्ध होणार आहे.

शिक्षण क्षेत्रात आमुलाग्र सुधारणा करण्यासाठी केंद्राने गतवर्षी नवे शैक्षणिक धोरण सादर केले होते. या धोरणाद्वारे उच्च शिक्षणाच्या प्रवेशातील अडथळे दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थी इंग्रजीच्या भीतीपोटी अभियांत्रिकीच्या शिक्षणाकडे पाठ फिरवतात. पण, आता मएआयसीटीईफने या विद्यार्थ्यांना त्यांच्याच मातृभाषेत हे शिक्षण घेण्याची सुविधा प्रदान केली आहे. यामुळे या विद्यार्थ्यांनाही अभियांत्रिकीच्या क्षेत्रात भवितव्य घडवण्याचे आपले स्वप्न साकार करता येणार आहे.

Protected Content