चोपडा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । चोपडा तालुक्यातील अडावद येथे सोमवारी भरणाऱ्या साप्ताहिक बाजारादरम्यान रस्त्यावर व पुलावर बेशिस्तपणे उभी करण्यात आलेली वाहने आणि प्रवासी रिक्षांमुळे वाहतुकीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला. या वाहतूक कोंडीचा फटका वटार-सुटकार गावांतील विद्यार्थ्यांना बसला असून विद्यार्थ्यांना घेऊन येणारी राज्य परिवहन महामंडळाची बस तब्बल तासभर पुलावर अडकून राहिली. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्याने याला जबाबदार कोण, असा सवाल पालक आणि नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
घटनेनुसार, 27 रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास वटार-सुटकार गावांमधील विद्यार्थ्यांना घेऊन येणारी एसटी बस अडावद येथील शनिमंदिराजवळील पुलावर पोहोचली. मात्र पुलावर आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूंना चारचाकी वाहने, प्रवासी रिक्षा तसेच मालवाहू वाहने बेशिस्तपणे उभी असल्यामुळे बस चालकाला पुढे जाण्यासाठी पुरेशी जागा मिळाली नाही. वळणाच्या ठिकाणी बस अडकून पडल्याने वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली.

सुमारे तासभर बस त्याच ठिकाणी अडकून राहिल्याने विद्यार्थ्यांना शाळेत वेळेत पोहोचता आले नाही. अखेर वाहतूक हवालदार फिरोज तडवी घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी वाहने हटवून वाहतूक सुरळीत केली. त्यानंतर बस पुढे रवाना झाली. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, अडावद येथे प्रत्येक सोमवारी साप्ताहिक बाजार भरत असल्यामुळे शनिमंदिराजवळील पुलावर आणि वटार रस्त्यावर वाहतूक कोंडीची समस्या नियमितपणे उद्भवते. रिक्षा, मालवाहू वाहने, खासगी चारचाकी आणि दुचाकी रस्त्यावरच उभ्या केल्या जात असल्याने मोठा अडथळा निर्माण होतो. परिणामी एसटी बस, बैलगाड्या, दुचाकीस्वार आणि इतर वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागते. अनेकदा किरकोळ वाद आणि वादावादीचे प्रकारही घडत असल्याचे नागरिकांनी सांगितले.
या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी ग्रामपंचायतीने वटार रस्त्यावर तसेच पुलालगत कोणालाही दुकाने किंवा अतिक्रमण करू देऊ नये, अशी मागणी होत आहे. तसेच रहदारीस अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनांवर नियमितपणे कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी अपेक्षा नागरिक आणि तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी संबंधित वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवणे ही स्थानिक प्रशासन आणि संबंधित यंत्रणांची जबाबदारी असल्याचे मतही व्यक्त होत आहे. दर सोमवारी घडणाऱ्या या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन कायमस्वरूपी नियोजन करण्यात यावे, अन्यथा भविष्यातही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान आणि वाहतूक कोंडीचा त्रास कायम राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे.



