शाळेचं नव्हे, मुलांच्या भविष्याचे दार उघडले ! : मुख्यमंत्री

मुंबई प्रतिनिधी | कोरोनानंतर आज फक्त शाळाच उघडल्या नसून भविष्याचे दार उघडले असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केले. आज माझे विद्यार्थी माझी जबाबदारी कार्यक्रमांतर्गत विद्यार्थी आणि शिक्षकांशी संवाद साधतांना ते बोलत होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी संवाद साधला. प्रारंभी त्यांनी विद्यार्थी आणि शिक्षकांना शाळा सुरू झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी त्यांच्या शालेय जीवनातील आठवणींनाही उजाळा दिला. ते म्हणाले की, मला माझे शाळेतले दिवस आठवताहेत. सुट्टीनंतर शाळेचा पहिला दिवस उत्साहाने भरलेला असायचा. पूर्वीचा दिवस वेगळेच असायचे. मित्रांना भेटण्याची उत्सुकता, नवीन वह्या पुस्तके, गणवेश मिळायचे. आत्ताच्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यातला हा आव्हानात्मक काळ सुरू आहे. शाळा सुरू करण्याचा निर्णय घेणे कठीण आणि आव्हानात्मक होतं आणि आहे. मुलं नाजूक असतात, त्यांचे वय घडण्याचे असते. आज आपण मुलांच्या विकासाचे , प्रगतीचे दार मुलांसाठी उघडतो आहोत. त्यामुळे अधिक काळजी घेणे गरजेचे आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, कोरोनाने आपल्याला बरेच काही शिकविले आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व विदयार्थी, शिक्षक, पालक यांना शुभेच्छा देतो. मुलांची काळजी घेणे आपली जबाबदारी आहे. ती निश्चितपणे पार पडली जाईल असा मला विश्वास आहे, असंही ते म्हणाले. आज शाळेचं दार उघडलं आहे ते विद्यार्थ्यांच्या भविष्याचं दार उघडलं आहे. माझी शिक्षक आणि पालकांना विनंती आहे, आपल्या पाल्याची जबाबदारी व्यवस्थितपणे घ्या आम्ही सोबत आहोत. एखाद्या शिक्षकाची तब्येत बिघडली असल्यास त्यांनी टेस्ट करुन घेणं आवश्यक आहे. विद्यार्थ्यांची तब्येत बिघडल्यास तातडीनं उपचार करुन घ्यावेत. प्रत्येक सीझनमध्ये आजार येतात. आता ऑक्टोबर हीट येईल. त्यामुळे कोरोना तर नाही ना याची काळजी घ्या, असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिला.

Protected Content