उत्तर महाराष्ट्र पक्षी मित्र संमेलन 2025 : अध्यक्षपदी डॉ. विनोद भागवत निवड चातक निसर्ग संवर्धन संस्था आणि वन्यजीव विभाग, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या 27 व 28 डिसेंबर 2025 रोजी पाचवे उत्तर महाराष्ट्र पक्षी मित्र संमेलन दादासाहेब चौधरी वन प्रशिक्षण संस्था, पाल (ता. रावेर) येथे उत्साहात पार पडणार आहे. पक्षीसंवर्धन, अधिवास संरक्षण आणि संशोधनात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संशोधक-प्रेमींचा एकत्र येणारा हा खास सोहळा यंदा अधिक भव्य स्वरूपात होणार आहे.

या संमेलनाचे अध्यक्षपद डॉ. विनोद भागवत (धुळे) यांना प्रदान करण्यात आले असून त्यांचे निवड सर्व स्तरांतून स्वागत करण्यात येत आहे. गेल्या १५ वर्षांपासून पक्षीनिरीक्षण, पक्षी-अभ्यास आणि सर्वेक्षण क्षेत्रात ते अविरत कार्यरत आहेत. उत्तर महाराष्ट्र पक्षी मित्र संघटनेचे सक्रिय संस्थापक सदस्य म्हणून त्यांनी केलेले संवर्धन कार्य राज्यभर गौरवले गेले आहे.

संमेलनाच्या निमित्ताने विविध प्रतिष्ठित पुरस्कारांची घोषणाही करण्यात आली आहे. डॉ. अनिल माळी यांच्या नावाने देण्यात येणारा “पक्षी जनजागृती पुरस्कार” साठी अमळनेर येथील अश्विन लीलाचंद पाटील यांची निवड झाली आहे. “महिला पक्षी अभ्यासक पुरस्कार” न्यू कॉन्झरवरतर्फे जळगावच्या डॉ. चंचल शहा यांना जाहीर झाला असून युवा पक्षी मित्र पुरस्कार” डॉ. सुधाकर कुऱ्हाडे यांच्या नावाने जळगावचे राहुल सोनवणे यांना देण्यात येणार आहे. या सर्व पुरस्कारांमध्ये रोख रु. १५५१ आणि सन्मानपत्र असे स्वरूप आहे.
संमेलनाचे उद्घाटन जळगाव जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते होणार असून वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. आमदार अमोल जावळे, आमदार चंद्रकांत पाटील, माजी आमदार शिरीष चौधरी, वनसंरक्षक कृष्णा भवर, उपवनसंरक्षक जमीर शेख व राम धोत्रे, वन प्रशिक्षण केंद्र संचालक हेमंत शेवाळे तसेच दिपनगर औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता राजेश मोराळे यांची उपस्थिती या संमेलनाची शोभा वाढवणार आहे. राज्यभरातून २०० हून अधिक पक्षीमित्र, अभ्यासक आणि संशोधक उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे.
या वर्षी संमेलनाची मुख्य थीम “पाणथळ अधिवास आणि पाणथळावरील पक्षी — संरक्षण आणि संवर्धन” अशी जाहीर करण्यात आली आहे. या विषयावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन, स्लाइड शो, व्याख्याने आणि अनुभवकथन अशी माहितीपूर्ण सत्रे आयोजित केली जातील. सहभागींसाठी जंगल सफारी, कॅम्प फायर, आदिवासी नृत्य आणि पारंपरिक खानदेशी खाद्यसंस्कृतीचा आनंद घेण्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे. या संमेलनाबद्दल अधिक माहिती समन्वयक विलास महाजन आणि सचिव श्री. चौधरी यांनी दिली.



