उत्तर कोल्हापूर कॉंग्रेसचेच : जयश्री जाधव यांचा दणदणीत विजय

कोल्हापूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या उत्तर कोल्हापूर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत कॉंग्रेसच्या जयश्री जाधव यांनी दणदणीत विजय संपादन केला असून येथे भाजपला धक्का बसला आहे.

कोल्हापूर उत्तर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी आज सकाळी आठ वाजेपासून सुरू झाली. कॉंग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या या जागेवर झालेल्या या जागेवर ही निवडणूक झाली. या निवडणुकीत कॉंग्रेसकडून चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री यांना उमेदवारी देण्यात आली. तर भाजपने सत्यजीत कदम यांना उमेदवारी दिली होती. कॉंग्रेस आणि भाजप यांच्यात प्रामुख्याने ही लढत झाली. अत्यंत चुरशीने याचा प्रचार झाला असून दोन्ही बाजूंनी एकमेकांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. यामुळे येथे नेमके कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

सकाळी ८ वाजता मतमोजणी सुरुवात झाली असून २६ फेर्‍यात मतमोजणी होणार आहे. यात पहिल्या फेरीपासून जयश्री जाधव यांनी आघाडी घेतली. मध्यंतरीच्या तीन-चार फेर्‍यांचा अपवाद वगळता त्यांनी आपली आघाडी कायम राखली. त्यांना २६ फेर्‍यांच्या अखेरीस ९६२२६ मते जयश्री जाधव यांना मिळालीत. तर भाजपचे सत्यजीत कदम यांना ७७४२६ इतकी मते मिळालीत. यामुळे श्रीमती जाधव यांचा १८८०० इतक्या मतांनी विजय झाला.

 

Protected Content