मुक्ताईनगरात अजब-गजब : एकीकडे पाणी टंचाई तर दुसरीकडे भयंकर नासाडी !

मुक्ताईनगर-पंकज कपले | आपल्या भोंगळ कारभारासाठी कुख्यात असणार्‍या मुक्ताइनगर नगरपंचायतीच्या गलथानपनाचा नवीन किस्सा हा पाणी पुरवठ्याच्या संदर्भात समोर आला असून यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत.

मुक्ताईनगरच्या नगरपंचायतीला सध्या कुणीच वाली नसल्याचे दिसून येत आहे. बहुतांश नगरसेवक एकीकडे तर नगराध्यक्षा दुसरीकडे अशी स्थिती असल्याने याचा मोठा फटका मुक्ताईनगरकरांना बसत आहे. शहरातील विकासकामांना भला मोठा ब्रेक लागला असल्याने नागरिक संतापले असतांनाच आता वाढत्या तापमानापासोबत पाणी टंचाईचा फटका देखील बसू लागला आहे.

वाढत्या उन्हाळ्यामुळे पूर्णा नदीपात्रातील जलपातळी कमी झाल्यामुळे शहरातील पाणी पुरवठा हा विलंबाने होणार असल्याचे नगरपंचायतीने नागरिकांना कळविले आहे. यासाठी शहरातून रिक्षा फिरवण्यात येत असून सोशल मीडियात देखील याच्या क्लिप्स मोठ्या प्रमाणात व्हायरल करण्यात येत आहेत. अर्थात, येत्या काही दिवसांमध्ये शहरात भीषण पाणी टंचाई असेल असा इशारा नगरपंचायतीनेच दिलेला आहे.

दरम्यान, एकीकडे नागरिकांना पाणी टंचाईची सूचना देत असतांना दुसरीकडे बस स्टँडच्या मागे असणार्‍या वॉर्ड क्रमांक-१३ मध्ये असणार्‍या जलकुंभात अर्थात पाण्याच्या टाकीमधून अक्षरश: लाखो लीटर पाटील हे ओव्हरफ्लो होऊन वाहत आहे. एकीकडे पाणी नसल्याची बोंब ठोकायची आणि दुसरीकडे पाण्याची बेसुमार नासाडी करायची असा हा प्रकार सुरू असून याबाबत कोण कारवाई करणार असा सवाल आता शहरातून विचारण्यात येत आहे.

मुक्ताईनगरात संपूर्ण राज्य व जिल्हा गाजवणारे नेते असतांना देखील ते मुक्ताईनगरकरांना दिलासा देण्यात अपयशी ठरले आहेत. तर, नगरपंचायत प्रशासनाच्या मनमानीपणाला आळा कोण घालणार ? अशी विचारणा त्रस्त नागरिक करू लागले आहेत.

Protected Content