जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जिल्हा दुध संघात रावेर तालुक्यातून ठकसेन पाटील यांच्या उमेदवारीला आव्हान देणारी याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे. यामुळे पाटील यांचा निवडणूक लढविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
याबाबत वृत्त असे की, जिल्हा दुध संघाची निवडणूक प्रक्रिया सध्या स्थगिती झालेली असतांनाच न्यायालयात एक याचिका प्रलंबीत होती. ठकसेन पाटील यांच्या निवडणुकीचा अर्ज नाशिक येथील सहकार आयुक्त (दुग्ध) यांनी वैध ठरविल्यानंतर जगदीश बढे यांनी याच्या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सुनावणी झाली.
या सुनावणीत दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने जगदीश बढे यांचा दावा फेटाळून लावत ठकसेन पाटील यांना निवडणूक लढविता येणार असल्याचा निकाल दिला. यामुळे आता रावेर तालुक्यातून जगदीश बढे हे बिनविरोध होणार नसून त्यांच्या विरोधात ठकसेन पाटील हे उभे राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या वृत्ताला महायुतीचे उमेदवार अरविंद देशमुख आणि चिनावल येथील भाजप पदाधिकारी श्रीकांत सरोदे यांनी दुजोरा दिला आहे.