Home Cities जळगाव पोलीस अधीक्षक कार्यालयात ‘भरोसा सेल’च्या इमारतीचे भूमिपूजन !

पोलीस अधीक्षक कार्यालयात ‘भरोसा सेल’च्या इमारतीचे भूमिपूजन !

0
141


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जिल्हा पोलीस दलाच्या माध्यमातून महिला आणि बालकांच्या सुरक्षिततेसाठी तसेच त्यांच्या तक्रारींचे तत्पर निवारण करण्यासाठी ‘भरोसा सेल व समुपदेशन केंद्राच्या’ नवीन इमारतीचा भूमिपूजन सोहळा आज, ८ मार्च रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात आयोजित या कार्यक्रमात पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याहस्ते इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले.

पीडितांना मिळणार सर्वंकष मदत :
पीडित महिला आणि बालकांना एकाच छताखाली कायदेशीर साहाय्य, मानसिक समुपदेशन आणि पोलीस मदत उपलब्ध करून देणे हा या केंद्राचा मुख्य उद्देश आहे. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी प्रास्ताविकात नमूद केले की, हे केंद्र आधुनिक सोयी-सुविधांनी सज्ज असेल, ज्यामुळे पीडितांना आपली बाजू मांडताना सुरक्षित आणि आश्वासक वातावरण मिळेल. सामाजिक सुरक्षिततेच्या दृष्टीने हा उपक्रम जिल्ह्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

प्रकल्पाचा आर्थिक व तांत्रिक तपशील :
या प्रकल्पासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून एकूण २ कोटी ९७ लाख रुपयांच्या अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आली आहे. या इमारतीचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभाग, जळगाव यांच्या देखरेखीखाली करण्यात येत असून, चाळीसगाव येथील जगन्नाथ इन्फ्रा कंपनीमार्फत हे काम पूर्ण केले जाणार आहे. कार्यकारी अभियंता राहुल पाटील आणि उपविभागीय अधिकारी सुनिल देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली कामाचे नियोजन करण्यात आले आहे.

मान्यवरांची उपस्थिती
या सोहळ्याला अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे, एलसीबीचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड आणि जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश गोराडे यांच्यासह शहरातील विविध पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पोलीस प्रशासनाच्या या सकारात्मक पुढाकाराचे विशेष कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन नितीन गणापुरे यांनी केले.


Protected Content

Play sound