आता लपाछपी नाही, थेट घुसून हल्ला करू – लष्करप्रमुखांचा इशारा

imageed487c6b 5d61 424c 9f5f 5a5913cd6036

नवीदिल्ली, वृत्तसंस्था | पाकिस्तानमधील बालाकोट येथे दहशतवादी तळ पुन्हा एकदा सक्रिय झाल्याची माहिती समोर आली असून यादरम्यान लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी सीमारेषेवर लपाछपीचा खेळ जास्त वेळ चालणार नाही, असा इशारा दिला आहे. जम्मू काश्मीरमधील परिस्थितीचा फायदा पाकिस्तानला मिळवू देणार नाही, अशी भारताची अगदी स्पष्ट भूमिका असून, गरज पडल्यास नियंत्रण रेषाही पार करु, असे रावत यांनी स्पष्ट केले आहे.

 

बालाकोटमध्ये जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी तळ पुन्हा एकदा सक्रीय झाले आहेत. मग आपल्या सर्जिकल स्ट्राइकचा काय फायदा झाला ? असे विचारले असता रावत यांनी सांगितले की, “दोन्ही स्ट्राइकमध्ये एक महत्त्वाचा संदेश देण्यात आला होता तो म्हणजे, जोपर्यंत सीमेपार शांतता राहील आणि परिस्थिती बिघडवण्याचा प्रयत्न होणार नाही, तोपर्यंत सीमारेषा पार केली जाणार नाही. पाकिस्तान दहशतवाद्यांना नियंत्रित करते, दहशतवादी त्यांचे प्रॉक्सी म्हणून काम करतात. यापुढे लपाछपीचा हा खेळ चालणार नाही, जर आम्हाला सीमारेषा पार करावी लागली मग ती हवाई मार्गाने असो अथवा जमिनीवरुन, आम्ही ती करु”

पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांना आयएसआय आणि लष्कराचे समर्थन मिळण्यासंबंधी बोलताना ते म्हणाले की, “या गोष्टी एकमेकांशी संबंधित आहेत. भारताकडून इतके पुरावे सादर केल्यानंतही आपण दहशतवाद्यांना समर्थन देत नसल्याचा दावा ते करत आहेत. ५ ऑगस्टनंतर त्यांनी जाहीरपणे काश्मीरमध्ये जिहादसंबंधी वक्तव्य केले नाही का ? जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादाला समर्थन देण्याचा हा प्रकार आहे. दहशतवादाला समर्थन देण्यासाठी लागणाऱ्या सुविधा तुम्ही एका रात्रीत उभ्या करु शकत नाही, त्या आधीपासूनच पाकिस्तानात उपलब्ध आहेत. पाकिस्तानात दहशतवाद्यांचे अड्डे कायम आहेत, फक्त हे दरवेळी त्यांची जागा बदलत असतात”

नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवरील परिस्थितीसंबंधी सांगताना त्यांनी म्हटले की, “५ ऑगस्टनंतर घुसखोरीच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. खोऱ्यात दहशतवादी संघटनांकडे नेतृत्त्व नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पाकिस्तान हिंसा भडकावण्यासाठी तसेच तरुणांची माथी भडकावण्यासाठी काही जणांना सीमेपार पाठवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण आम्ही कोणीही सीमारेषा पार करुन भारतात घुसखोरी करणार नाही, याकडे लक्ष ठेवून आहोत. काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करणे आमचे लक्ष्य आहे”,काश्मीरमधील परिस्थितीवर बोलताना त्यांनी सांगितले की, “अनेक लोकांना हा निर्णय आपल्या हिताचा आहे याची खात्री पटू लागली आहे. ३० वर्षांच्या हिंसाचारानंतर लोकांनी आता शांतता नांदावी यासाठी एक संधी द्यायला हरकत नाही”.

Protected Content