बोरखेडा हत्याकांड ; डॉ प्रवीण मुंढे यांचा देशभरातील वरिष्ठ पोलीसांशी संवाद

 

 रावेर ; प्रतिनिधि ।  महाराष्ट्रभर गाजलेल्या बोरखेडा  हत्याकांडाच्या पोलीस अधीक्षक   डॉ प्रवीण मुंढे यांनी केलेल्या तपासाची दखल केंद्रीय  गृह मंत्रालयाने घेतली आहे. महिलांविषयीच्या गुन्ह्यांमध्ये देशभरातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना अशा घटनांच्या तपासाची दिशा मिळावी या हेतूने ही घटना केंद्रीय गृहमंत्रालयाच्या ब्युरो ऑफ पोलीस रिसर्च ऍन्ड डेव्हलोपमेंट विभागातर्फे अभ्यासासाठी निवडण्यात आली आहे. 

बोरखेडा रस्त्यावरील शेतात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करीत तिच्यासह चौघा अल्पवयीन बहीण भावंडांच्या हत्येची घटना १६ ऑक्टॉबरला उघडकीस आली होती. राज्याला हादरवणाऱ्या या घटनेचा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंढे यांनी शास्रोक्त व वैज्ञानिक पद्धतीने तपास करीत अवघ्या सहाव्या दिवशी या घटनेतील आरोपीला पुराव्यानिशी अटक केली होती. 

 सोमवारी महिला दिनानिमित्त  दिल्ली येथून या विभागातर्फे “महिलांची सुरक्षितता व संवेदनशीलता” या विषयावर वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे. वेबिनारमध्ये डॉ मुंढे हे राज्यातील एकमेव अधिकारी म्हणून सहभागी होणार आहेत. ते हत्याकांडाच्या घटनेचा व केलेल्या तपासाचा वेबिनारमध्ये सहभागी विविध राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसमोर उलगडा करणार आहेत.  

 या घटनेचा पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंढे यांनी अत्यंत संयमाने, बारकाईने व शास्त्रोक्त पद्धतीने तपास केला होता. तपासी अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांनी दिलेल्या महत्वाच्या टिप्स आरोपीपर्यंत पोहचण्यास महत्वपूर्ण ठरल्या होत्या. आरोपीविरुद्ध मिळालेल्या परिस्थितीजन्य, वैज्ञानिक आणि शास्त्रीय पुराव्यामुळे या घटनेचा उलगडा करण्यात रावेर पोलिसांना यश आले होते.यासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी नरेंद्र पिंगळे, पोलिस निरिक्षक रामदास वाकोडे, शितलकुमार नाईक यांनीही मोलाची कामगिरी बजावली होती.

बोरखेडा हत्याकांडाची  घटना व तपासाची दखल केंद्रीय गृह मंत्रालयाने घेतली आहे. केंद्र सरकारच्या ब्युरो ऑफ पोलीस रिसर्च ऍन्ड डेव्हलोपमेंट संस्थेने अभ्यासासाठी व प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली आहे .महिलांविषयी दाखल होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये पोलिसांमध्ये संवेदनशीलता व सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी हा या  वेबिनारचा मुख्य उद्देश आहे.

सोमवारी दिल्ली येथून आयोजित करण्यात आलेल्या या वेबिनारचे उदघाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा करणार आहेत. या वेबिनारमध्ये सहभागी होणाऱ्या विविध राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या अभ्यासासाठी व प्रक्षिशक्षणासाठी चार केसेस ठेवण्यात आल्या आहेत. त्यात महाराष्ट्रातून बोरखेडा येथील केसचा समावेश आहे. या हत्याकांडाची घटना व तपासात परिस्थितीजन्य पुरावे, इंटरनेटचा वापर, विविध ठिकाणचे सीसीटीव्हीचे सिडीआर, डीएनए चाचणी, शास्त्रोक्त व वैज्ञानिक पद्धतीचा केलेला वापर याची माहिती जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंढे पीपीटीद्वारे देणार आहे

केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अखत्यारीतील इंडियन पोलीस सायन्स कॉन्फरन्स या संस्थेनेही बोरखेडा येथील हत्याकांडाच्या गुन्ह्याच्या डॉ मुंढे यांनी केलेल्या तपासाची नोंद घेतली आहे. या संस्थेतर्फे दिल्लीत आगामी काळात होणाऱ्या राष्ट्रीय पोलीस परिषदेत डॉ मुंढे यांचा सहभाग असणार आहे.

Protected Content