मुंबई (वृत्तसंस्था) अडचणीत असलेल्या साखर कारखान्यांना केंद्र आणि राज्य सरकारकडून पॅकेज दिले जाते, बँकेकडून कर्ज दिले जाते या संस्था टिकाव्या म्हणून हे करावं लागतं. कर्ज देताना संचालक देत नाहीत, यंत्रणा सगळ्या बाबी तपासते त्यानंतरच कर्ज दिले जाते. त्यामुळे आपण बँकेत कोणताही भ्रष्टाचार केला नाही हे राज्यातील जनतेला सांगू इच्छितो, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी म्हटले आहे.
यावेळी अजित पवार म्हणाले की, आमचे म्हणणे मांडायला संधी न देता एफआयआर दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले, त्यानंतर ईडीने ही कारवाई केली. त्यामुळे जे प्रश्न आहेत त्याची उत्तरे आम्हाला द्यावी लागतील, ती आम्ही द्यायला तयार आहोत, असे अजित पवार म्हणाले. बँकेचा व्यवहार 12 हजार कोटीच्या ठेवी असताना गैरव्यवहार 25 हजार कोटीचा कसा? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. आज ती बँक 250 ते 300 कोटीच्या नफ्यात आहे. जर बँक चांगली चालली नसती तर नफा मिळवला नसता. यासंदर्भातील नोटीस आल्यानंतर मी याबाबत वकीलांशी चर्चा करणार असल्याचे ते म्हणाले.