मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांना कॉंग्रेसचा पाठींबा नसल्याची महत्वाची घोषणा आज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी काल हायव्होल्टेज ड्रामा झाला. कॉंग्रेसने सुधीर तांबे यांना तिकिट दिले असले तरी त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. तर, त्यांचे पुत्र सत्यजीत तांबे यांनी मात्र अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली. या माध्यमातून तांबे पिता-पुत्राने कॉंग्रेसचा गेम केल्याची चर्चा सुरू झाली. आपण कॉंग्रेसचेच असून भाजपची मदत मागणार असल्याची माहिती सत्यजीत तांबे यांनी काल दिली होती. मात्र याला कॉंग्रेसने साफ नकार दिला आहे.
कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज पत्रकारांशी बोलतांना सत्यजीत तांबे यांच्यावर तोफ डागली. आपल्या पक्षाने डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी दिली होती. मात्र त्यांनी धोका देऊन आपल्या मुलाची उमेदवारी सादर केली. तथापि, सत्यजीत तांबे यांच्या उमेदवारीला कॉंग्रेसचा पाठींबा नसेल असे त्यांनी स्पष्ट केले. तर या प्रकरणी लवकरच पक्ष कारवाई करणार असल्याचे सूतोवाच देखील त्यांनी केले.