पाटणा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसंस्था | नितीश कुमार यांनी भाजपसोबत असलेली युती तोडत राज्यपालांकडे आपला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सोपवला. तोच आता ते उद्या लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाच्या साथीत नव्याने बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.
संयुक्त जनता दलाचे (जेडीयू) अध्यक्ष नितीशकुमार यांनी भाजपासोबत काडीमोड करून आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीमाना दिला आहे. नितीशकुमार यांच्या या निर्णयामुळे येथे नवे सत्तासमीकरण जुळून येण्याची शक्यता आहे. तसे संकेत खुद्द नितीशकुमार यांनी दिले आहेत. नितीश कुमार यांनी आरजेडी तसेच अन्य मित्रपक्षांसोबत महागठबंधन करून सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. राज्यपालांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलत असताना त्यांनी ही माहिती दिली आहे.
“महागठबंधनमध्ये एकूण सात पक्ष आहेत. महागठबंधनमधील सर्व पक्षांचे एकूण १६४ आमदार आहोत. या सर्व आमदारांच्या समर्थनाचे पत्र आम्ही राज्यपालांना सोपवले आहे. तसेच सत्तास्थापनेचा दावा केला आहे. मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी कधी असेल, याची माहिती राज्यपाल देणार आहेत.” अशी माहिती नितीश कुमार यांनी दिली आहे.