चोपडा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव जिल्हा इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या ३ वर्षांच्या अंतरिम कालावधीसाठी निवडलेल्या ६३ नवीन सहयोगी सदस्यांमध्ये चोपडा येथील नक्षत्र ज्वेलर्सचे संचालक आणि रोटरी परिवारातील नितिन अहिरराव यांची निवड झाली आहे.
२८ मार्च रोजी जिल्हा नियोजन भवन येथे झालेल्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते रेडक्रॉसचे सन्मानचिन्ह देऊन नितिन अहिरराव यांचा सत्कार करण्यात आला. रोटरी क्लब चोपडाचे माजी अध्यक्ष आणि रोटरी 3030 सह-प्रांतपाल असलेल्या अहिरराव यांनी सामाजिक सेवेत केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल ही निवड मिळवली आहे.
यावेळी पदग्रहण सोहळ्यात रेड्रॉस सोसायटीचे पदाधिकारी गनीजी मेनन,विनोद जी बियाणी, डॉ.प्रसन्न कुमार रेदासानी,घनश्याम जी महाजन, सुभाष जी सांखला, विजय जी पाटील, पुष्पाताई भंडारी, शांताबाई वाणी, डॉ नरेन्द्र ठाकूर यासोबत इतर पदाधिकारी उपस्थित होते. या निवडीबद्दल नितिन अहिरराव यांचे मित्र मंडळी तसेच रोटरी परिवाराकडून अभिनंदन होत आहे.
रेडक्रॉस ही जगातील १८७ देशांमध्ये ७० लाख स्वयंसेवकांच्या सहकार्याने अखंडपणे सेवा देणारी आंतरराष्ट्रीय संघटना आहे. सर हेनरी ड्यूनान्ट यांनी या आंतरराष्ट्रीय मानवतावादी सेवाभावी दृष्टीकोनातून संस्थेची स्थापना केली होती. भारतात दिल्ली येथे १९२० साली रेडक्रॉस सोसायटीची स्थापना झाली. रेडक्रॉस दिल्ली या राष्ट्रीय पातळीवर महामहीम राष्ट्रपती, तर राज्य पातळीवर महाराष्ट्रचे राज्यपाल, जिल्हा पातळीवर जिल्हाधिकारी या संस्थेला पदसिद्ध अध्यक्ष असतात. अशा या आंतरराष्ट्रीय सेवाभावी संस्थेवर जळगाव जिल्हा शाखेवर नितिन अहिरराव यांची सहयोगी सदस्य म्हणून निवड झाली आहे.
या संस्थेमार्फत मार्फत गरजूंना २४ तास रक्तसेवा उपलब्ध असते तसेच कॅन्सर संजीवनी मार्गदर्शन केद्र, रेडक्रॉस जिल्हा दिव्यांग पुनर्सन केंद्र, ईं सेतू सुविधा, निक्षय मित्र योजना, पर्यावरण व वृक्षारोपण संवर्धन असे अनेक उपक्रम संस्थेमार्फत चालू असतात.