नवी दिल्ली वृत्तसंस्था | देशातील कोरोना रूग्णसंख्या वाढत असतांना आता निती आयोगाने या लाटेची तीव्रता आधीपेक्षा कितीतरी जास्त प्रमाणात असेल असा इशारा दिला आहे.
भारतात करोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असल्यानं चिंता वाढली आहे. तर, ओमायक्रॉन प्रकाराचे रुग्णही मोठ्या संख्येनं आढळत आहेत. या पार्श्वभूमिवर, आपण आता करोनाच्या प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढीचा सामना करत आहोत आणि ही वाढ ओमायक्रॉनमुळे नोंदवण्यात येत आहे, असा आमचा विश्वास आहे. ही वाढ विशेषतः आपल्या देशाच्या पश्चिम भागात आणि मोठ्या शहरांमध्ये अधिक असल्याचं आमच्या जवळ उपलब्ध असलेल्या डेटामधून समोर आलंय, असं निती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ व्ही. के. पॉल म्हणाले.
या संदर्भात डॉ. पॉल पुढे म्हणाले की, ३० डिसेंबर रोजी केस पॉझिटिव्ह रेट १.१ टक्के होता आणि दुसर्या दिवशी तो १.३ टक्के होता आणि आता देशात ५ टक्के पॉझिटिव्हिटी रेट नोंदवला जात आहे, असे ते म्हणाले. त्याचप्रमाणे ३० डिसेंबरला करोना बाधितांची संख्या १३ हजार होती, ती मंगळवारी म्हणजेच ४ जानेवारीला ५८ हजारांवर पोहोचली. अर्थातच, ही वेगाने पसरणारी महामारी आहे. आर नॉट व्हॅल्यू २.६९ आहे. करोनाची दुसरी लाट पीकवर असताना हे केवळ १.६९ होतं, त्यामुळे तुलनेने ही संख्या खूप जास्त आहे. यावेळी करोना रुग्णांच्या संक्रमीत होण्याचा वेग जास्त आहे, असं पॉल म्हणाले.
दरम्यान, रुग्ण रुग्णालयात भरती होण्याचं प्रमाण कमी आहे, ही काहीशी दिलासादायक बाब आहे. सध्या दिल्लीत रुग्ण भरती होण्याचं प्रमाण हे ३.७ टक्के आणि मुंबईत ५ टक्के आहे. आमच्याकडे असलेल्या माहितीनुसार २०२० आणि २०२१ मध्ये करोना लाटेच्या सुरुवातीच्या काळात हे प्रमाण २० टक्क्यांच्या जवळपास होते, असं पॉल म्हणाले.