मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे यांना मुंबई पोलिसांनी दिशा सालियान मृत्यूप्रकरणी नोटीस बजावली आहे. ज्यामध्ये त्यांना येत्या शुक्रवारी म्हणजेच 12 जुलै रोजी चौकशीस हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत याची माजी मॅनेजर दिशा सालियन 2020 मध्ये मृतावस्थेत आढळली होती. तिचा मृत्यू नव्हे तर मृत्यूपूर्वी तिची हत्या झाल्याचा दावा नितेश राणे यांनी अनेक वेळा जाहीररित्या दावा केला होता.

मुंबई पोलिसांच्या नोटीशीनुसार नितेश राणे यांनी मालवणी पोलीस ठाण्यात हजर राहणे आवश्यक आहे. जेथे त्यांची दिशा सालीयान मृत्यू प्रकरणी केलेल्या दाव्यांबाबत चौकशी केली जाईल. या प्रकरणात आपल्याकडे अनेक पुरावे आहेत. जे आपण पोलिसांनी मागितले तर त्यांना देऊ असे नितेश राणे यांनी प्रसारमाध्यमांपूढे बोलताना सांगितले होते. दरम्यान, पोलिसांनी पाठवलेले समन्स आपणास नुकतेच मिळाले आहे. मी पहिल्या दिवसापासून सांगत आहे की हे हत्येचे प्रकरण आहे. मी मुंबई पोलीस विचारतील त्या सर्व प्रश्नांना उत्तरे देत सहकार्य करण्यास तयार आहे. एमव्हीए सरकारला कव्हरअप करून आदित्य ठाकरे यांना वाचवायचे होते. माझ्याकडे जी काही माहिती आहे, ती मी पोलिसांना देण्यास तयार आहे, असे राणे म्हणाले. राणे यांनी समन्स बजावल्यानंतर अधिकाऱ्यांना सहकार्य करण्याच्या तयारीचा पुनरुच्चार केला.