निशाअक्का : लढा एका मर्दानीचा !

d8bb6b9d e421 4ec7 979d 8051cd9b5b56

फोटो : प्रतीकात्मक सौजन्य : अंतरमायाजाल

जळगाव : विजय वाघमारे

 

आज जागतिक महिला दिनानिमित्त अनेक उत्सवी कार्यक्रम घेतले जातील. स्त्रीशक्तीचा जागर व समानतेच्या व्याख्यानमाला देखील भरतील. परंतु हे होत असताना समाजात अजूनही देहविक्री करणाऱ्या महिलांच्या वाटेला सन्मान नसल्याचे कटू सत्य आपल्याला स्वीकारावेच लागेल.‘रेड लाईट एरिया’ म्हणजे कायमच अस्पृश्य विषय मानला गेलाय. या सामाजिक विषमतेकडे गांभीर्याने लक्ष न दिले गेल्यास आजच्या उत्सवी कार्यक्रमांना अर्थ उरणार नाही. म्हणून अमळनेरमधील एका देहविक्री करणाऱ्या महिलेची सत्य कहाणी आपल्या समोर मांडतोय. एका मर्दानी प्रमाणे अतिशय कठीण परिस्थितीला सामोरी जाणारी निशाची (नाव बदलेले आहे) कहाणी महिलांना खऱ्या अर्थाने प्रेरणा देणारी आहे. पुरुषसत्ताक समाजात आणि प्रतिकूल परिस्थितीत न डगमगता उभे राहणाऱ्या या स्त्रीशक्तीला सलाम !

 

 

सर्व सामान्य मुलीप्रमाणे लग्न झाल्यावर आपला सुखाचा संसार असेल,असेच सुंदर स्वप्न निशाने देखील रंगवून ठेवलेले होते. परंतु मुलगी झाली म्हणून नवऱ्याने टाकून घातल्यानंतर तिच्या जीवनाची पुरती वाताहत झाली. जन्मदात्या आईवडिलांनी साथ सोडली. एवढेच नव्हे तर,बालपणीच्या प्रियकराने देखील धोका दिला. एकेदिवशी दुधासाठी रडणाऱ्या पोरीच्या अश्रुंनी निशाच्या ममतेला आपली आब्रू दुसऱ्याच्या अंथरुणात गहाण टाकण्यासाठी मजबूर केले. आज निशा…निशाअक्का झालीय. तिने दिलेल्या पैशांवर आई-वडिलांचे आजारपण दूर झालेय. लहान भाऊला नौकरी लागली, त्याने लग्न केले. वडिलांनी गहान ठेवलेली शेती देखील परत मिळवलीय. अगदी परिवाराचे सर्व दारिद्र्य दूर झालेय. परंतु ज्या घरात निशाने जन्म घेतला, ज्या अंगणात खेळली. त्या अंगणात परतायचे तिचे स्वप्न आजही पूर्ण होऊ शकलेले नाहीय. ज्या अंगणातून तिची डोली उठली होती, त्याच अंगातून आपली अर्थी निघावी, ही एकमेव इच्छा पूर्ण करण्यासाठी आज निशा जगतेय.

 

 

बऱ्यापैकी ढोसलेल्या अवस्थेत साठीतला एक म्हातारा त्याची त्याची बडबड करत मुंबई गल्लीत घुसत होता. अमळनेरच्या चखला बाजारात अशी ढोरं काही नवीन नव्हती. पिवळ्या पानाचा देठ हिरवा,असल्यागत म्हातारा मस्त गाणी बडबड करत गल्ली-बोळातून पोरी निहारात होता. शेवटी एका ठिकाणी त्याची नजर आणि पाय दोन्ही थबकले. पण खिशात दमडी नसल्यामुळे राणीला म्हटला… आज खुश करि दे…पुढना महिनामा ज्वारी आणि गहू निघताबरोबर दोन-दोन पोतं आनिसन टाकी देस. राणी तेवढ्या तडकली…ये बुढे चल भाग यहा सें…ये उधारी का धंदा नही हैं. पण बुढ्ढा ऐकण्याच्या मनस्थित नव्हता. बराच गोंधळ माजल्यानंतर वरच्या खोलीतून आवाज आला…ये क्या चालू हैं रे वहाँ…राणी म्हाताऱ्याला म्हणते भागजा…निशाअक्का नीचे आयगी ना, तो तेरी खैर नही. तेवढ्यात तोंडातून पानाची पिचकारी मारत, वेणीतील गजऱ्यासोबत खेळत निशाअक्का खाली उतरली. क्या रे बुढे…क्या तमाशा लगाया हैं…म्हतारा म्हणतो…काई नई…आज पैसा नहीत…पण मूड जोरदार बनेल शे…पण हाई नही म्हणी राहयनी. निशाअक्का राणीकडे बघून डोळ्यांनी इशारा करत खोलीत जायला सांगते. तेवढ्यात राणी म्हणते…पर अक्का बोहनी का टाइम हैं…निशाअक्का आपल्या ब्लाऊजमधून शंभरची नोट काढत निशाच्या हातात टेकवते. मुळात मालकीण बाईनं आपल्या गाठचा पैसा खर्च करावा…ही गोष्ट सर्वांनाच आश्चर्यात टाकणारी होती. राणी बाहेर आल्यावर निशाअक्का आपने पैसे क्यू दीए? त्यावर निशाअक्का उत्तरते जाने दो…अगर बुढ्ढा यहा थंडा नही होता, तो साला बहार जाकर किसी की बेटी या बहुका नास करता. खरं म्हणजे अक्कासारख्या खडूस बाईच्या तोंडून हे वाक्य ऐकून सगळ्याच पोरी नवल करायला लागल्या. कारण अक्कामधील एका स्त्रीच्या मनाचं सौंदर्य सगळ्यांनी पहिल्यांदा अनुभवलं होतं.

 

कधीकाळी घरंदाज पोरगी असलेली निशा अमळनेरच्या चखला बाजारातील अक्का अन् मालकीण कधी बनली,हे तिच्या लक्षात देखील आले नाही. निशा तारुण्यात आल्याबरोबर आई-वडिलांनी दहावीत असतांनाच लग्न लावून दिलं होतं. खरं म्हणजे ओझं हलकं होतंय, याच भावनेने निशाची लगीनगाठ बांधली गेली होती. लग्नाचा पूर्ण अर्थ समजलाही नव्हता,तोपर्यंत निशाचे पाय देखील भारी झाले होते.ओटीभरून माहेरी वाट लावतांना ध्यान रखना ससुरजी बेटा लेणे मैं खुद आयुंगा म्हणत निशाच्या नवऱ्याने थोडक्यात त्याला पोरगाच पाहिजे असल्याचा हुकूम सोडला होता. आई-बाबांसोबत निशा देखील तेव्हापासूनच दबावात आली होती. मातृत्वाचे उत्तरदायित्व आपल्या आईकडून समजून घेत असतांनाच दिवस भरले आणि निशा आई बनली. अवघ्या सतरा वर्षाची कोवळ्या निशाच्या पदरात देवानं कोवळी पोरचं टाकली. पोरगीच तोंड पाहण्याआधीच सगळ्यांच्या उरात एकच धडकी भरली. आता कसं होणार? परंतु तेवढ्यात निशाच्या नवऱ्याचा फोन आला. मुझे पता चल गया म्हणत, त्याने निशाला टाकून घातल्याचं ताडकन सांगून टाकलं. कारण त्याच्या पुरुषी बाण्याच्या व्याख्येत त्याला पोरगी होऊ शकते, हे मान्यच होतं नव्हते. दुसरीकडे निशासह तीच्या आई-वडिलांनी एकच हाय खाल्ली.

 

दिवस पाट-पाट जात राहिले. निशाला काही तरी केल्याशिवाय पर्याय नव्हता. अखेर निशाला तालुकाच्या गावी टायपिंग शिकायला जायला लागली. आपल्या वडिलांची परिस्थिती जेम-तेम असल्याची पूर्ण जाणीव निशाला होती. कारण तीच्या लग्नाचे कर्ज फेडण्याच्या विवंचनेत अनेक वेळा तिने आपल्या आई-वडिलांना बोलतांना ऐकले होते. ज्या काली-पिलीने निशा शाळेत जायची यायची, ती सम्याची रिक्षा आजही मलकापूरला ये जा करत होती. एका हातात पोरगी अन् दुसऱ्या हातात टायपिंगचं दप्तर घेत आता निशाचे अपडाऊन सुरु झाले होते. अप-डाऊनमध्ये सम्याची नजर आरशातून निशावरच खीळलेली असायची. शाळेत ये-जा करतांना देखील सम्या आणि निशाची अशीच नजरा-नजर व्हायची परंतु अल्हड वयात निशाला सम्याचं एकतर्फी प्रेम समजून आले नव्हते. परंतु आता हळू-हळू निशादेखील सम्याकडे आकर्षित झाली होती. दुसरीकडे निशाची फारकत कोर्टात अंतिम टप्प्यात होती.

 

हळू-हळू निशा आणि सम्याचं प्रेम बहरू लागले. आता गावातील टवाळ पोरं निशाला वाकडं बोलू लागली होती. शेवटी व्हायचं तेच झालं अख्या गावात बोभाटा झालाच. निशा कथित उच्च जातीतील तर सम्या वाड्यात राहणारा पोरगा. निशाला जीवनात आधार आणि तीच्या पोरीला बाप पाहिजे होता. त्यामुळे गावातील पंच मंडळीसमोर ती सम्याच्या बाजूनं ठाम राहिली. दोन्ही ऐकत नसल्याचे बघत गावातील पंच मंडळीने वाद नको म्हणून दोघांना गावाबाहेर जाण्यास सांगून वाळीत टाकले. निशा आपल्या डोळ्यात सम्याबरोबरच्या सुखी संसाराची स्वप्न घेऊन मलकापुरला निघाली. घरातून जाण्यापूर्वी निशाला तीच्या आई-वडिलांनी नको ते ते बोलले,शिव्या घातल्या. रांड… तू आमच्यासाठी आजपासून मेली…वैगैरे वैगैरे…!

 

सम्या जीव ओवाळून निशावर प्रेम करत होता. परंतु दोघांचा सुखी संसार जास्त दिवस टिकला नाही. कारण दोस्तांनी आता सम्याला निशाच्या पोरीवरून टोमणे मारायला सुरुवात केली होती. दुसऱ्याचं जन तू काहून वाढवतोय? म्हणून नातेवाईक देखील सम्याला टोचून बोलायला लागले होते. कधी काळी घरी बसून जेवणा पुरता पिणारा सम्या आता अट्टल बेवडा होण्याच्या मार्गावर होता. अर्थात त्यामुळे निशासोबत त्याचे खटके उडणे नित्याचेच झाले होते. सम्या आता दोन-दोन दिवस घरी येत नव्हता. एकदा तर चांगले पंधरा दिवस झाले तरी सम्याचा घरी पत्ता नव्हता. किराणा दुकानवाला आणि घरमालक असं दोन्ही पैशांसाठी तकादा लावायला लागले होते. एकदिवशी निशाची पोरगी दुधासाठी व्याकूळ होत, जीवाच्या आकांताने रडत होती. पण निशाच्याच पोटात दोन दिवसापासून काहीच नव्हते. त्यामुळे पान्हा येईल तर कसा? घरमालक तसा शेजारून ओरडायला लागला. निशा त्याच्याकडे गेली आणि बाबा काही खरगट अशीनतं देता का? लई भूक लागलीय आणि पोरगीभी दुधासाठी रडतेय. घरमालकाने घरातील उरलेले जेवण दिले. निशा पटपट जेवण उरकले आणि पोरीला छातीला लावून दुध पाजायला लागली.

 

दोन-तीन दिवसानंतर पोटात अन्नाचा कण गेल्यामुळे निशा तशीच झोपी गेली. रात्री आठवाजेच्या सुमारास देशीची बाटली रीचवून घरमालक डुलत-डुलत घरी जात होता. निशाच्या घराचा दरवाजा उघडा पाहून त्याने डोकावून पहिले तर पोरीला दुध पाजणाऱ्या निशाची उघडी छाती दिसली आणि त्याच्यातला सैतान बाहेर आला. त्याने घराची कडी लावत निशावर बळजबरी करायला लागला. काही दिवसाची उपाशी असलेल्या निशाचा प्रतिकार व्यर्थ ठरला. घरमालक म्हाताऱ्याने अखेर निशाला आपल्या ताकदीपुढे नमवलेच. मी तुम्हाला बाबा म्हणायची आणि तुम्ही असं का केलं? म्हणत निशा रडत होती. घरमालकाने धोतरातील नोटांचं बंडल काढत निशाच्या अंगावर फेकलं आणि म्हटला माझं चुकलं पण कोणाला सांगू नको. तुला लागले तर तुझ्या किराण्याचे बिल देखील भरतो. पण मला माफ करं. हे पहाय…तुझा नवरा येत नाही तोपर्यंत घरं भाडं पण देऊ नको. मीच तुला किराणा देखील भरून देत जाईल. फक्त तू कोणाला सांगू नको.

 

निशाला गपचूप बसण्याशिवाय पर्याय नव्हता. परंतु निशाला कल्पना नव्हता की, घरमालकातील सैतान दररोज दारू पिल्यावर तीच्या देहाची राख-रांगोळी करायला येत जाणार आहे. आता अख्या गल्लीत चर्चा व्हायला लागली होती. कारण घरमालकाने निशाला गावातील त्याच्यासारख्याच ठर्की मित्रांकडे न्यायला सुरुवात केली होती. निशा आता समजून चुकली होती की, सम्याने देखील तिला टाकून घातलेय. आई-वडील घरात घेणार नाहीत. त्यामुळे पोटाची खळगी भरण्यासाठी आणि आपल्या पोरीच्या भवितव्यासाठी देहविक्री करणे गरजेचे होते. थोड्याच दिवसात निशाच्या रुपरंगाची तारीफ गावातील आंबटशौकीनांमध्ये व्हायला लागली. निशाच्या नावाची चर्चा थेट अमळनेरात देखील पोहचली होती. त्यामुळे अनेक घरमालकीण तिला खोली द्यायला तयार होत्या. तर निशाला देखील आता जास्तीचा पैसा कमवायचा होता.

 

निशा काही दिवसांनी अमळनेरात पोहचली. परिसरात थोड्याच दिवसात निशाच्या रुपाच्या चांदणीने कहर माजवला. निशा आता दिवस उजाडल्यापासून ते अख्खी रात्र आपल्या देहाचा बाजार मांडत होती. थोडक्यात आपलं तारुण्य दगा देण्यापूर्वी निशाला भरपूर पैसा कमावून ठेवायचा होता. झालं तसचं अवघ्या काही दिवसात निशा लखपती होत मालकीण झाली. आता तीच्या खोलीवर अनेक पोरी धंदा करत होत्या. निशाने आधीच आपल्या पोरीला धंद्याच्या गंदगीपासून लांब होस्टेलमध्ये ठेवलेले होते. दुसरीकडे मात्र, याच ठिकाणी सुनिताबाई आणि रेशमा या दोन्ही मायलेकी वेगवेगळ्या मालकीनिकडे धंदा करीत होत्या.

 

एकेदिवशी निशाला शोधत शोधत तिचा लहान भाऊ बॉम्बे गल्लीतील चखल्यात पोहचला. निशाच्या चेहऱ्यावर लावलेला भडक मेकअप अश्रूच्या धारांनी वाहून निघाला. लहान भैय्याला बघत निशा धायमोकलून रडली. बऱ्याच वेळानंतर तिने स्वतःला सावरत भाऊला माय-बापाची खुशहाली विचारली. त्यावर भाऊ बोलला दीदी…पप्पा की तबियत बहोत खराब हैं. इलाज कें पैसे नही हैं. त्यावर निशा म्हणाली…तू फिकीर मत कर मैं तेरे साथ चालती हुं. मैं सब खर्च करूंगी. त्यावर भाऊने दिलेले उत्तर निशाचे काळीज चिरणारे होते. दीदी… तुम मत आयो…पप्पा की तबियत ज्यादा खराब हो जाएगी. गाव में सब को पता हैं तुम्हारे बारे में…अगर हो सके तो कुछ पैसे दे दो. निशाला कळून चुकले होते की, माय-बापाला निशा चालणार नाही. परंतु तिचे पैसे चालतील. निशाने कपाट खोलत पाचशे रुपायांचे चार-पाच बंडल भावाकडे दिले आणि भावाला म्हटली. ये पैसे ले और दुबारा यहाँ पर मत आणा. तुझे अगर और पैसे चाहिए, तो मुझे सिर्फ फोन कर देना म्हणत त्याला रवाना केले. त्या दिवशी निशा खूप दारू प्यायली. एवढेच नव्हे तर, खोलीतल्या सर्व पोरींना देखील दारू पाजली. मेरा भैय्या था…हम बचपन में ऐसा करते…स्कूलमें, घरमें ऐसी मस्ती करते थे…अशा गोष्टी सांगात निशा रडायची अन् दारू पित होती.

 

आज निशाने दिलेल्या पैशांवर आई-वडिलांचे आजारपण दूर झालेय. लहान भाऊला नौकरी लागली, त्याने लग्न केले. एवढेच नव्हे तर गावात मोठे घर बांधून दिले. वडिलांनी गहान ठेवलेली शेती देखील परत मिळवलीय. अगदी परिवाराचे सर्व दारिद्र्य दूर केले. एवढेच काय तर सम्याला देखील वागवतेय. परंतु ज्या घरात निशाने जन्म घेतला, ज्या अंगणात खेळली. त्या अंगणात परतायचे तिचे स्वप्न आजही पूर्ण होऊ शकलेले नाहीय. ज्या अंगणातून तिची डोली उठली होती, त्याच अंगातून आपली अर्थी निघावी, ही एकमेव इच्छा पूर्ण करण्यासाठी आज निशा जगतेय. परंतु तिला माहित नाहीय की तिचे अखेरचे स्वप्न पूर्ण होईल किंवा नाही.

 

देहविक्री करणाऱ्या महिलांच्या वाटेला येणारे दारिद्र्य आणि हेटाळणी पाचवीलाच पुजलेली असते. समाजातील एक घटक म्हणून त्यांचे प्रश्न, त्यांच्या वेदना समजून घेणे आपल्या कथित सभ्य आणि सुसंस्कृत म्हणवून घेणाऱ्या समाज कधीही समजून घेणार नाही. मुळात ‘रेड लाईट एरिया’ म्हणजे कायमच अस्पृश्य विषय मानला गेलाय. परंतु या ठिकाणी जीवनाचा खरा रंग दिसून येत असतो. येथील चकाकणारी चांदणी रात्र जीवनातील परमोच्च काळोखापेक्षा कमी नसते. रेड लाईट एरियाच्या ‘निशा’ची नशा अनेकांना आयुष्यात बरबाद करते म्हणे…पण येथील अनेक निशा आयुष्याचा शेवट तरी किमान परिवारासोबत व्हावा म्हणून झुरत असतात. कारण निशा सारख्या अनेक मुलींच्या आयुष्यात उषःकाल होता होता, काळरात्र होत असते आणि कायमही राहत असते !

Add Comment

Protected Content