चाळीसगाव प्रतिनिधी । तरूण पिढीने नैतिक मूल्यांचा आदर्श घ्यावा असे आवाहन डॉ. सुनील राजपूत यांनी केले. ते चितेगाव येथील व्याख्यानात बोलत होते.
चाळीसगाव शहरातील युगंधरा फाउंडेशन, देवरे फाउंडेशन,स्त्री रोग संघटना आणि रोटरी क्लब चाळीसगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ३ मार्च ते ८ मार्च या कालावधीत नारी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यात आज रोजी चितेगाव येथे वयोवृद्धांचे पालन व कर्तव्य या विषयावर अस्थिरोग तज्ञ डॉ.सुनिल राजपूत यांनी नारी सप्ताहाचे पाचवे पुष्प गुंफले. यावेळी आयोजित शिबीरप्रसंगी जवळपास २०० वर महिलांची हाडांची तपासणी करण्यात आली. याप्रसंगी डॉ. सुनील राजपूत म्हणाले की, समाजातील नैतिक मुल्याची घसरण होत आहे.पुर्वीच्या काळी एकत्र कुटुंबपद्धतीच्या घरांमधे वृद्धांचा प्रश्न फारसा त्रासदायक नव्हता.घरात अनेक माणसं असल्यामुळे वृद्धांना एकटेपणा काय ते माहित नव्हतं,घरातले कर्ते पुरुष पैसा कमावण्यासाठी घराबाहेर असायचे,स्त्रिया घर चालवण्याच्या कामात गर्क असल्या तरी मुलांकडे लक्ष द्यायला आजी-आजोबा होतेच त्यात वृद्धांची काळजीही घरात घेतली जायची.परंतु औद्योगिकीकरणानंतर ही परिस्थिती झपाट्याने बदलली आहे. आता सर्वांनी ही दुरापास्त झालेली परिस्थिती बदलवून एकत्र कुटुंबपध्दतीत यायला हवे असा आशावाद डॉ.सुनिल राजपूत यांनी व्यक्त केला
युगंधरा फाउंडेशनच्या संस्थापिका स्मिता बच्छाव यांनी आपल्या प्रास्ताविकतेतून नारी सप्ताहादरम्यान राबविण्यात आलेल्या शिबीरांची माहीती विशद करीत ग्रामीण भागात घेण्यात आलेल्या व्याख्यानाचा व विविध तपासणी शिबीरास महिलांनी भरभरुन प्रतिसाद मिळाल्याचे सांगितले. तर तालुक्यातील ११ कर्तुत्ववान महिलांना रणरागिणी पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असून खर्या अर्थाने नारी सप्ताहाची यशस्वी सांगता होत असल्याचे डॉ.उज्वला देवरे यांनी यावेळी सांगितले
याप्रसंगी रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रदीप भांडारकर,स्त्री रोग संघटनेचे अध्यक्ष डॉ.संजय चव्हाण,हिरकणी महिला मंडळाच्या संस्थापिका सुचित्रा पाटील,सामाजिक कार्यकर्त्या कावेरी पाटील,उद्योजक प्रवीण बागड,ब्रिजेश पाटील,स्वप्नील कोतकर,सरपंच अमोल भोसले,ग्रामसेवक आर.पी.वाघ,उपसरपंच किरण जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व्याख्याते प्रदीप देसले यांनी केले तर आभार पोलिस पाटील श्रीकृष्ण भोसले यांनी मानले,कार्यक्रम यशस्वीतेसाठी सागर गायकवाड,वैभव भोसले,सर्वेश भोसले यांनी परिश्रम घेतले.