नवी दिल्ली वृत्तसंस्था । दिल्लीतील २०१२ साली घडलेल्या निर्भया बलात्कार प्रकरणातील आरोपींना येत्या २२ जानेवारी रोजी फाशी दिली जाणार आहे. या फाशीचे लाईव्ह प्रसारण करण्यात यावे, अशी मागणी परी संस्थाने (एनजीओ) केली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडे या मागणीचे पत्र देण्यात आले आहे.
पत्रात म्हटल्याप्रमाणे, ‘देश आणि विदेशातील मीडिया संस्थांना परवानगी देण्यात यावी की, त्यांनी तिहार जेलमध्ये निर्भयाच्या दोषींना फाशीचे लाइव्ह प्रसारण करावे.’ ‘निर्भया प्रकरणातील दोषींना 22 जानेवारी 2020ला फाशी देण्याच्या निर्णयाचा मी आदर करते. मी तुम्हाला विनंती करते की, निर्भयाच्या चारही दोषींना फाशीची शिक्षा देण्याच्या संपूर्ण प्रक्रियेचे लाइव्ह टेलिकास्ट करण्यात यावे. यासाठी तुम्ही सर्व नॅशनल आणि इंटरनॅशनल मीडियाला परवानगी द्यावी. हा निर्णय महिलांच्या सुरक्षेच्या बाबतीत मोठा बदल ठरू शकतो’, अशी मागणी ‘परी’ (पीपल अगेंस्ट रेप इन इंडिया) या संस्थेच्या संस्थापिका आणि सोशल ॲक्टिव्हीस्ट योगिता भयाना यांनी केली आहे. तसेच या मागणीला भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईंनी देखील पाठिंबा दिला आहे.