नीरव मोदीला न्यायालयाने फरारी गुन्हेगार घोषित केले

nirav modi 1

नवीदिल्ली, वृत्तसंस्था | पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी नीरव मोदी याला विशेष न्यायालयाने फरार घोषित केले आहे. त्याने दिलेल्या मुदतीत न्यायालयासमोर हजर राहावे, अन्यथा त्याला फरारी गुन्हेगार घोषित केले जाईल, असा इशारा न्यायालयाने बुधवारी दिला होता.

 

विशेष न्यायालयाचे न्यायाधीश व्ही.सी. बर्डे यांनी मोदी याच्यासह त्याचा भाऊ नीशल आणि सहकारी सुभाष परब या प्रकरणातील आणखी दोन आरोपींनाही हाच इशारा दिला होता. कायद्यानुसार न्यायालयाने आरोपीला असा इशारा देत दिलेल्या मुदतीत आरोपीने न्यायालयासमोर हजर होणे आवश्यक आहे. परंतु त्यानंतरही तो न्यायालयासमोर हजर झाला नाही, तर त्याला फरारी आरोपी जाहीर केले जाते. एवढेच नव्हे, तर आरोपीला फरारी घोषित केल्यानंतर तपास यंत्रणा भारतातील त्याच्या मालकीच्या मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया सुरू करू शकते. मोदी आणि त्याचा काका मेहुल चोक्सी दोघेही पळून गेले आहेत. मोदीला लंडन पोलिसांनी अटक केली असून त्याच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया प्रलंबित आहे. नीशल आणि सुभाष परब यांचा ठावठिकाणा नाही.

गुन्हा दाखल होण्यापूर्वीच तिन्ही आरोपी देश सोडून पळून गेले होते. त्यामुळे तपास यंत्रणेने आरोपींची मालमत्ता जप्त करण्याची परवानगी मागितली होती. मोदी याला फरारी आर्थिक गुन्हेगार जाहीर करण्याची मागणी अंमलबजावणी संचालनालयाने आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक न्यायालयाकडे केली होती. गुरूवारी यावर झालेल्या सुनावणी दरम्यान न्यायावलयाने नीरव मोदीला फरार आर्थिक गुन्हेगार म्हणून घोषित केले आहे.

Protected Content