बायडेन यांचे पूर्वज मुंबईकर !

 

मुंबई : वृत्तसंस्था । बायडेन यांचं भारताबरोबर आणि त्यातही मुंबईबरोबर एक खास नातं आहे. यासंदर्भात स्वत: बायडेन यांनीच खुलासा केला होता.

डेमोक्रेटिकचे उमेदवार असणारे बायडेन हे २०१३ रोजी अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष म्हणून भारत दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी मुंबईमध्ये दिलेल्या एका भाषणामध्ये आपले भारताबरोबरचे खास नाते असल्याचे म्हटले होतं. बायडेन यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते १९७२ साली पहिल्यांदा निवडणूक जिंकले तेव्हा त्यांना मुंबईमधील एका बायडेन कुटुंबाने पत्र पाठवलं होतं. यापत्रामध्ये मुंबईकर बायडेन कुटुंबाने आपल्या दोन्ही कुटुंबांचे पूर्वज एकच असल्याचा उल्लेख केला होता. बायडेन कुटुंबाचे पूर्वज १८ व्या शतकामध्ये इस्ट इंडिया कंपनीमध्ये काम करायचे असंही या पत्रामध्ये म्हटलं होतं. मात्र पुढे या पत्रावरुन आपण त्या कुटुंबाशी फारसा संवाद साधू शकलो नाही आणि याबद्दल आपल्याला अधिक माहिती मिळवता आली नाही असं सांगत जो बायडेन यांनी खेदही व्यक्त केला होता.

अमेरिकेतील वॉशिंग्टनमधील एका इंडो-युएस फोरमच्या बैठकीमध्येही त्यांनी आपल्या भारताबरोबरच्या संबंधांचा उल्लेख केला होता. आमच्या एका पूर्वजाने भारतीय महिलेशी लग्न केलं असावं आणि आजही माझ्या कुटुंबाशी संबंध असणारे काही लोकं भारतात असतील असं बायडेन म्हणाले होते. त्यावेळी त्यांनी आपल्याला एका पत्रकाराने मुंबईत बायडेन अडनाव असलेले पाच लोकं आहेत अशी माहिती दिल्याचेही सांगितले होते. आपल्या भारताबद्दलच्या कनेक्शनसंदर्भात बोलताना त्यांनी मस्करीमध्ये, भविष्यात मी भारतातूनही निवडणूक लढवू शकतो असंही म्हटलं होतं.

Protected Content