मुंबई प्रतिनिधी । मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली कार आढळून आल्याच्या प्रकरणाची चौकशी एनआयएतर्फे करण्यात येणार असून आज या पथकाने चौकशी सुरू केली आहे.
मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर काही दिवसांपूर्वी स्फोटकांनी भरलेली कार सापडली होती. याप्रकरणाचा तपास करण्यासाठी आता राष्ट्रीय तपास यंत्रणेचे पथक मुंबईत दाखल झाले आहे.
या पथकात पोलीस महासंचालक दर्जाच्या एका अधिकाऱ्याचा समावेश असल्याचे समजते. या पथकाने कालच मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांच्याकडून तपासाची प्राथमिक माहिती घेण्यात आली.
आतापर्यंत हा तपास मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे होता. त्यामुळे आता एनआयए गुन्हे शाखेकडे तपासासंदर्भातील कागदपत्रांची मागणी करु शकते. याशिवाय, हे पथक हिरेन मनसुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेईल, असेही सांगितले जात आहे.