सुरू झाला महावितरणचा तीन दिवसीय संप !

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | खासगीकरणाच्या विरोधात महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी मध्यरात्रीपासून संप सुरू केला असून यामुळे अनेक ठिकाणचा वीज पुरवठा खंडीत झाल्याचे वृत्त आहे.

राज्यात वीज पुरवठ्याच्या खासगीकरणाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. अडाणी समूहाने यासाठी परवानगी मागितली आहे. अर्थात, महावितरणचे खासगीकरण करण्यात येणार असल्याचे यातून स्पष्ट झाले आहे. याच्याच विरोधात महावितरणचे कर्मचारी आणि अधिकार्‍यांनी काल मध्यरात्रीपासून तीन दिवसांचा संप पुकारला आहे. आज दिवसभरात ठिकठिकाणी निदर्शने आणि आंदोलने देखील करण्यात येणार असल्याची माहिती कर्मचारी संघटनांनी दिली आहे.

दरम्यान, काल रात्री बारा वाजेपासून अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी आपापले काम बंद केले आहे. सध्या तरी यामुळे फार काही स्थिती विकोपाला गेलेली नसली तरी अनेक ठिकाणी खंडीत झालेला विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी कर्मचारीच नसल्याने अडचणी निर्माण झाल्या आहेत.

नागपूर, पुणे, सातारा आदींसह अनेक जिल्ह्यांमध्ये वीज पुरवठा बंद झाल्याच्या घटना घडल्या आहेत. कर्मचार्‍यांचा संप सुरूच राहिलीस मात्र मोठी अडचण निर्माण होऊ शकते. आज दुपारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कर्मचारी संघटनांशी बोलणी करणार असून यामधून काही तरी तोडगा निघणे अपेक्षित आहे.

Protected Content