नवी दिल्ली वृत्तसंस्था | कोरोनाने नवनवीन व्हेरियंट समोर येत असतांना नियोकोव ही नवीन आवृत्ती अधिक धोकेदायक ठरणार असल्याचा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे.
ओमायक्रॉननंतर कोरोनाच्या ‘नियोकोव’ या नव्या व्हेरियंटने चिंता वाढविली आहे. दक्षिण आफ्रिकेत हा व्हेरियंट आढळून आला आहे. नियोकोव व्हेरियंटचा प्रादुर्भावही वेगात होईल आणि यामुळे मृत्यूही मोठ्या प्रमाणावर होतील. व्हेरियंटची लागण झालेल्या तीनपैकी एक जण दगावेल, असे भयावह भाकीत वुहानमधील वैज्ञानिकांनी याबाबत वर्तवले आहे.
सध्या हा व्हेरियंट कुठल्याही माणसामध्ये नव्हे, तर वटवाघळामध्ये आढळलेला आहे. रशियातील स्पुत्निक वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार हा व्हेरियंट कोरोनाच्या ‘मर्स कोव’ विषाणूशी संबंधित आहे. सर्वांत आधी मर्स कोवचे रुग्ण २०१२ आणि २०१५ मध्ये पश्चिम आशियातील देशांतून आढळले होते. तेव्हाही हा व्हेरियंट जनावरांमध्येच आढळला होता. दक्षिण आफ्रिकेत हा नियोकोव व्हेरियंट आता वटवाघळात आढळला आहे.
दरम्यान, नियोकोव आणि त्याचा सहकारी विषाणू पीडीएफ-२१८०-कोव्ह यांची माणसांना लागण होऊ शकते. वुहान विद्यापीठ आणि ‘चायना ऍकॅडमी ऑफ सायन्सेस’च्या संशोधकांच्या मते, या माणसांच्या पेशी संक्रमित करण्याची क्षमता अर्जित करण्यासाठी या नव्या कोरोना विषाणूत केवळ एका म्युटेशनची (एका बदलाची) आवश्यकता आहे. रशियातील ‘व्हायरोलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी’ विभागाने मात्र याला घाबरण्याची आवश्यकता नसल्याचे सांगितले आहे. या व्हेरियंटस्ची माणसात संक्रमणाची शक्यता तूर्त अगदीच कमी आहे. या व्हेरियंटची क्षमता आणि जोखीम दोन्हींसंदर्भात आम्ही आणखी संशोधन करायला हवे, असे रशियातील या विभागाचे म्हणणे आहे.
यासोबत ओमायक्रॉनचा सब-स्ट्रेन ‘बीए-२’नेही चिंता वाढविली आहे. आरटी-पीसीआर चाचणीतही तो आढळत नसल्याने ही स्थिती आहे. बीए-२ भारतासह ४० देशांतून आढळला असून, उर्वरित जगातही तो वेगाने पसरण्याची शक्यता आहे.