मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्य सरकारने महाविकास आघाडी सरकारचा प्रभाग आणि वॉर्ड रचना वाढीचा निर्णय रद्द करून २०१७ प्रमाणेच निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे वाढीव जागा आपोआपच रद्द होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.
महाविकास आघाडी सरकारचे अनेक निर्णय विद्यमान सरकारने रद्द केले आहेत. यात नगराध्यक्ष आणि सरपंच हे थेट जनतेतून निवडून जाणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. या पाठोपाठ आता नवीन प्रभाग आणि वॉर्ड रचना रद्द करण्यात आली आहे. २०१७च्या अनुसार आता यापुढील महापालिका आणि नगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत. यामुळे वाढलेले प्रभाग आणि वॉर्ड देखील रद्द होणार आहेत.
आज झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत वॉर्ड रचनांबाबत निर्णय घेण्यात आला. महाविकास आघाडी सरकारने काही ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नवीन प्रभाग रचना जाहीर केली होती. पण त्याबाबत घेतलेल्या निर्णयांना रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि महापालिकांच्या निवडणुकांमध्ये २०१७ साली जी प्रभागरचना होती तशीच प्रभागरचना आगामी निवडणुकीतही राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.