यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | यावल तालुक्यातील महेलखेडी येथील जिल्हा परिषदच्या शाळेच्या इमारतीच्या खोल्यांचे होत असलेले काम हे अत्यंत निकृष्ठ प्रतिचे होत असल्याची तक्रार अनेक ग्रामस्थांनी केली आहे.
याबाबत पंचायत समिती प्रशासनाच्या वतीने अद्याप कुठल्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने या निकृष्ठ कामांना पंचायत समितीच्या बांधकाम विभागाकडून आर्थिक टक्केवारीतून पाठींबा मिळत असल्याची संत्पत भावना व्यक्त होत आहे.
या संदर्भात महेलखेडी तालुका यावल येथील जिल्हा परिषद शाळाच्या नवीन खोल्यांचे बांधकाम लाखो रुपयांच्या निधीतून सुरू असून प्रगतीपथावर आहे . याबाबत दिनांक २१ मार्च २०२२ च्या तक्रारीनुसार पंचायत समिती यावल यांच्याकडील चौकशीसाठीचे पत्र (क्रमांक जा.क्र.पंस/बांध/आर.आर/९५/२०२१) व्दारे पंचायत समितीच्या प्रशासनाच्या वतीने होणारी चौकशी अद्याप न झाल्याने तक्रारकर्त्यांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
राजकीय पुढारी, ठेकेदार व अधिकारी यांच्या संगनमताने या शाळा खोल्यांचे बांधकाम करण्यात येत असून या खोल्याचे बांधकाम शासकीय नियमानुसार होत नसल्याने कामाच्या गुणवत्तेची तपासणी करावी. अशी मागणी करण्यात येत आहे.
भविष्यात या बांधलेल्या निकृष्ठ खोल्यांचे बांधकाम कोसळले व त्यात विद्यार्थ्यांची जिवीतहानी झाल्यास जबाबदार कोण राहणार ? असा प्रश्न व भिती ग्रामस्थ व महेलखेडीच्या तरूणांकडून व्यक्त करण्यात येत असून तरी जिल्हा परिषदच्या वरिष्ठ पातळीवरून त्वरीत या सुरू असलेले खोल्याचे बांधकाम थांबवून चौकशी करावी आणि संबधितांवर कारवाई करावी. अशी मागणी करण्यात येत आहे.