पुनगावातील अतिक्रमणाचा वाद चिघळला : महिलांचे गट विकास अधिकारी यांना निवेदन

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील पुनगाव शिवारातल्या राजीव गांधी कॉलनीत आरक्षित भुखंडावरील अतिक्रमणाच्या विरोधात आज तेथील महिलांनी गट विकास अधिकारी यांना निवेदन देऊन या प्रकरणी कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.

 

पुनगाव शिवारातील राजीव गांधी कॉलनीत आरक्षित भुखंडावर काही नागरिकांनी अतिक्रमण करत व्यवसाय थाटले आहेत. यासोबतच गुरांचा गोठा देखील करण्यात आला असून यामुळे शेजारील नागरिकांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या ओपन प्लेसवर झालेले अतिक्रमण काढण्यात येवुन त्याठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम, मुलांच्या खेळण्यासाठी गार्डन करण्यात या मागणीसाठी स्थानिक महिलांनी आज रोजी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना निवेदन दिले आहे.

 

निवेदन देते प्रसंगी स्थानिक महिला प्रतिभा पाटील, वैशाली पाटील, मनिषा पवार, शारदा पाटील, कविता नरसाळे, योगिता नरसाळे, शिल्पा पाटील, कांता कदम, सुनंदा सोनवणे, इंदुबाई लोडे, हर्षदा सोनार, शैला पाटील उपस्थित होत्या. तसेच महिलांच्या या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या जळगांव (पश्चिम) महिला जिल्हाध्यक्षा संगिता साळुंखे यांनी आपला पाठिंबा दर्शविला आहे.

 

मौजे पुनगाव शिवारातील राजीव गांधी कॉलनीतील प्लॉट नं. ८० वरील आरक्षित जागेवर काही विघ्नसंतोषी लोकांनी अतिक्रमण करत त्या जागेवर पिठाची गिरणी, मिर्ची कांडप मशिन, गुरांचा गोठा, ५० ते ६० पत्र्यांचे शेड तसेच वॉल कंपाउन्ड करुन संपूर्ण ओपन प्लेसवर अतिक्रमण केले आहे. या केलेल्या अतिक्रमणामुळे स्थानिक नागरिकांनी अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असुन गटारी व पावसाचे पाणी थेट त्यांच्या घरात घुसून रोगराई पसरत असते.

 

यासोबतच त्याठिकाणी गुरांचा गोठा देखील करण्यात आला असून या गुरांचा त्रास देखील नागरिकांना होत आहे. सदर जागेवर करण्यात आलेले अतिक्रमण हे तात्काळ काढण्यात यावे. व त्या जागेवर सांस्कृतिक कार्यक्रम, वृद्धांना बसण्याची व्यवस्था, मुलांना खेळण्यासाठी उद्यान उपलब्ध करून देण्यात यावे. या मागणीसाठी स्थानिक महिलांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना निवेदन दिले आहे. तसेच निवेदनाच्या प्रती तहसिलदार (पाचोरा), उपविभागीय अधिकारी (पाचोरा) यांना देण्यात आल्या आहेत. सदरची मागणी लवकरात लवकर मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा देखील महिलांनी दिला आहे.

Protected Content