स्वतःच्या स्वार्थासाठी जनतेचे शोषण करणे महापाप : प. पू. जनार्दन हरीजी महाराज

8e756648 0309 4fb6 b3e7 83bdedbc888b

 

फैजपूर (प्रतिनिधी) कथा प्रवचने व गौशाळे सारख्या पवित्र कार्याद्वारे स्वतःच्या स्वार्थासाठी जनतेचे शोषण करणे महापाप आहे. असे होत राहिल्यास या पवित्र कार्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलू शकतो. काही चुकीच्या लोकांमुळे धर्म कार्याची व संत पुरुषांची बदनामी होत असल्याने, अशा प्रवृत्तींना आळा घालणे गरजेचे झाले आहे,असे मार्गदर्शन महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज यांनी उपस्थित बाल गोपालांसह श्रोत्यांना केले.

 

येथील श्री स्वामी समर्थ मंगल कार्यालयात शिव कॉलनी मित्र मंडळाने आयोजित केलेल्या सत्पंथ चॅरिटेबल ट्रस्ट संचलित फैजपुर यांच्या मार्फत आषाढी एकादशीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अभंगवाणी, त्यात विठ्ठल, रुक्मिणी, संत तुकाराम, वासुदेव यांचा सजीव देखावा व सुमधुर आवाजात गायलेले भजन, नाटक, गोंधळ, पोवाडा, अभंग अशा विविध गाण्यांनी संपन्न झाला.

आज नुसत्याच मंदिरांची संख्या वाढवून उपयोग नाही. तर पांडुरंग जसा भक्तांसाठी धावून येतो, तसे आपणही इतरांच्या संकटात धावून जाणे म्हणजेच पांडुरंगाची भक्ती आहे. जल म्हणजेच पांडुरंग, वृक्ष म्हणजेच पांडुरंग, जिवंत माणूस म्हणजे पांडुरंग, असे मानून केलेली त्यांची सेवा म्हणजेच पांडुरंगाची भक्ती होय. आणि हेच पांडुरंगाला आपल्याकडून अपेक्षित आहे, असे महाराजांनी सांगितले. यावेळी स्वामीनारायण गुरुकुलचे शास्त्री भक्ती स्वरूप दासजी यांनीही आशीर्वचन दिले.

सतपंथ कला केंद्राचे ज्येष्ठ संगीत तज्ञ धनंजय नेहते, प्रा. उत्पल चौधरी, नंदिनी टोंगळे यांच्यासह केंद्रातील विद्यार्थी-विद्यार्थिनी यांनी आषाढी एकादशीनिमित्त सुमधुर कार्यक्रम सादर केला. यावेळी डॉ. अतुल सरोदे, डॉ. प्रियदर्शनी सरोदे, ज्येष्ठ कथाकथनकार प्रा. व. पु. होले यांच्यासह अशा असंख्य श्रोतेगण उपस्थित होते. कार्यक्रमासाठी शिव कॉलनीतील रहिवासी नगरसेवक देवा साळी, विलास तळले सर, कुंदन खाचणे सर, श्री. भालेराव यांनी परिश्रम घेतले.

Protected Content