जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | काल मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्या स्वागतासाठी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना वेठीस धरल्याचे व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर सायबरविश्वातून जोरदार टिका सुरू झाली आहे.
काल मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच आपल्या गावी येणारे अनिल भाईदास पाटील यांचे जंगी स्वागत करण्यात आले. जळगाव रेल्वेस्थानक ते त्यांच्या निवासस्थानापर्यंत अनेक ठिकाणी त्यांचे स्वागत आणि सत्कार झाला. अमळनेरात प्रवेश करतांना त्यांच्या स्वागतासाठी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना रस्त्याच्या दोन्ही बाजूला बराच वेळ उभे करण्यात आले होते. यात शालेय विद्यार्थी आणि विद्यार्थीनी यांचा समावेश होता. या विद्यार्थ्यांनी मंत्री येताच त्यांना सलाम ठोकला. हे विद्यार्थी माजी आमदार डॉ. बी.एस. पाटील यांच्या भावाच्या शैक्षणिक संस्थेतील होते हे विशेष.
दरम्यान, काल रात्रीच रस्त्याच्या दोन्ही बाजूने मंत्र्यांची वाट पाहणार्या विद्यार्थ्यांचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर याची अतिशय तीव्र प्रतिक्रिया उमटली. नेटकर्यांनी अतिशय तीव्र शब्दात याचा निषेध करत मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्या असंवेदनशीलपणावर कडाडून टिका केली आहे. या प्रकरणी त्यांनी अद्याप तरी कोणतेही भाष्य केले नाही.