ब्रेकींग : भालाफेकमध्ये नीरज चोप्राला सुवर्णपदक ! : ऐतिहासीक कामगिरीने देशभरात जल्लोष

टोकियो वृत्तसंस्था | येथे सुरू असलेल्या भालाफेक स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताच्या नीरज चोप्रा याने ऐतिहासीक कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले आहे. भारताचे आजवरचे ऍथलेटीक्समधील हे पहिले पदक ठरले आहे.

ऑलींपीकमधील शेवटच्या टप्प्यात बहुतेक संघ व खेळाडूंनी निराशा केली असतांना आज कुस्तीपटू बजरंग पुनिया याने कांस्य पदक पटकावले आहे. यानंतर सर्वांच्या नजरा नीरज चोप्रा याच्याकडे लागल्या होत्या. खरं तर त्याचा भालाफेकमधील अंतीम फेरीत प्रवेश हा काहीसा आश्‍चर्यकारक असाच होता. मात्र यामुळे तो पदक पटकावणार का ? याकडेही लक्ष लागले होते.

आजच्या अंतिम सामन्यातील प्रत्येक फेरीत नीरजने सरस कामगिरी करत आपली आघाडी कायम ठेवली. यातील पहिल्या फेरीत नीरजने ८७.०३ मीटर इतक्या दूर भाला फेकला. यानंतर दुसर्‍यात-८७.५८ मीटर; तिसर्‍यात-७६.७९; चौथ्यात-फाऊल या सर्व फेर्‍यांमध्ये त्याने अग्रक्रम कायम राखल्याने त्याला सुवर्णपदक मिळाले.

नीरज हा ऍथलेटीक्समध्ये पदक पटकावणारा भारताचा पहिलाच खेळाडू ठरला आहे. याआधी मिल्खा सिंग आणि पी.टी. उषा यांनी चौथ्या क्रमांकापर्यंत झेप घेतली होती. यानंतर कोणताही खेळाडू या कामगिरीच्या आसपास देखील कामगिरी करू शकला नव्हता. याआधी अभिनव बिंद्रा याने नेमबाजीत सुवर्णपदक पटकावले होते. यानंतर ही कामगिरी निरजने केली आहे. या पार्श्‍वभूमिवर नीरजचे यश हे ऐतिहासीक असेच मानले जात आहे. यामुळे भारतीय क्रिडा विश्‍वात जल्लोष व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, नीरज चोप्रा याच्या माध्यमातून एक इतिहास रचला असून त्याच्यावर देशभरातून कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. याआधीचा एकमेव सुवर्णपदक विजेच्या अभिनव बिंद्रा याने ट्विट करून नीरजचे कौतुक केले आहे. विविध सेलिब्रिटींनी त्याच्या कौतुकाचे ट्विटस केले आहेत. नीरजचे शहर असणार्‍या पानीपतमध्ये तर प्रचंड जल्लोष करण्यात आला आहे. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी नीरजचे मन:पूर्वक अभिनंदन करत त्याला सहा कोटी रूपयांचे पारितोषीक जाहीर केले आहे. त्याला राज्य सरकार क्लास-वन अधिकारीपदाची नोकरी प्रदान करणार असून त्याच्याच मार्गदर्शनाखाली पंचकुला येथे अद्ययावत स्पोर्टस सेंटर सुरू करण्यात येईल अशी माहिती देखील मुख्यमंत्र्यांनी दिली.

Protected Content