जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | माध्यमात कार्यरत असलेल्या प्रत्येक व्यक्तिला अधिक माहिती सक्षम होण्याचा मार्ग कृत्रिम बुद्धिमत्तेने म्हणजेच ‘एआय’ ने उपलब्ध करून दिला आहे. आपल्या मातृभाषेतून मिळणा-या ज्ञानाला ज्या मर्यादा होत्या, त्या मर्यादा आता ‘एआय’ च्या माध्यमातून कमी झाल्या आहेत. ज्या भाषेत आपल्याला माहिती हवी आहे, त्या भाषेत ती सहजरित्या उपलब्ध होते. त्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्तेपासून दूर राहण्याऐवजी तंत्रज्ञान समजून घेणे आणि आपल्या वापरातून ते अधिक परिपूर्ण करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे, असे प्रतिपादन माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी केले.
नागपूर प्रेस क्लब आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या संचालक नागपूर कार्यालयाच्या वतीने ‘आर्टिफिशल इंटेलिजन्स इन जर्नालिझम’ (कृत्रिम बुद्धिमत्ता आणि पत्रकारिता) या विषयावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ज्येष्ठ पत्रकार तथा माजी राज्य माहिती आयुक्त राहुल पांडे अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमास नागपूर प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीप मैत्र, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे नागपूर – अमरावती विभागाचे संचालक डॉ. गणेश मुळे, माहिती संचालक किशोर गांगुर्डे, दयानंद कांबळे उपस्थित होते.
श्री. ब्रिजेश सिंह म्हणाले, कोणतेही नवीन तंत्रज्ञान आले की नोक-या कमी होतील, अशी एक भीती व्यक्त होत असते. मात्र तंत्रज्ञानातून नवनवीन संधी निर्माण झाल्याची प्रचिती आपण आजवर घेत आलो आहोत. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या बाबतीतही अशीच भीती व्यक्त केली जात आहे. वास्तविक याचा परिपूर्ण वापर जर करता आला नाही, तर संबंधितांना आपल्या नोक-या गमाविण्याची भीती अधिक आहे. हे माध्यम वापरतांना मात्र प्रत्येकाला अगोदर स्वत:ला सिध्द करावे लागेल. एआयच्या माध्यमातून जी काही माहिती आपल्यासमोर येईल, त्या माहितीला अधिक पडताळून घेणे, त्यात असलेल्या त्रृट्या दुरूस्त करून अधिक परिपूर्ण करणे, अशा माहितीला नैतिक व संवैधानिक दृष्टीने पडताळून पाहणे व दक्ष राहून चुका दुरुस्त करणे, याचे भान प्रत्येकाने ठेवले पाहिजे, असा इशाराही त्यांनी यावेळी बोलतांना दिला.
आज विविध समाजमाध्यमांचा लोकांवर प्रचंड प्रभाव आहे. यात अनेक धोके आहेत. एखादी व्यक्ती गाफील राहून आपल्या मोबाईलवर आलेल्या चुकीच्या संदेशाला बळी पडला तर त्याला आर्थिक फसवणुकीलाही तोंड द्यावे लागते, याची अनेक उदाहरणे आहेत. यातील भीती बाजुला सारून आपण दक्ष असायला हवे. इतर प्राणीमात्रांबद्दल व्यक्ती म्हणून, माणूस म्हणून ज्या मानवतेच्या दृष्टीने आपण त्यांना पाहतो, त्याच दृष्टीमध्ये संवैधानिक व सत्य -असत्य या परिभाषेत सावध होत ‘एआय’ ला आपण जवळ केले पाहिजे. कोणतीही उत्सुकता ही ज्ञानाच्या स्त्रोतांपर्यंत आपल्याला घेऊन जात असते. पुर्वी या उत्सुकतेला आपण गुगलची जोड देऊन समाधान करून घेतले. आता या उत्सुकतेचे अधिक पुढचे पाऊल म्हणून एआय मार्फत मिळणा-या माहितीकडे पाहावे लागेल, असे त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय भाषणात माजी राज्य माहिती आयुक्त राहुल पांडे म्हणाले, आपल्यामध्ये मुळात असलेल्या गुणवत्तेसोबतच कृत्रीम बुध्दीमत्तेचा योग्य वापर करणे गरजेचे आहे. भारत विरोधी कृत्य करण्यासाठी एआय चा वापर होणार नाही, यासाठी एआय ची माहिती भारतीय पध्दतीने तयार करणे आवश्यक आहे. मराठी भाषेलासुध्दा एआय शी जोडावे लागणार आहे. तसेच अशा कार्यशाळांचे अधिकाधिक आयोजन व्हावे, अशी अपेक्षाही राहुल पांडे यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नागपूर प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीप मैत्र यांनी केले. संचालन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक डॉ. गणेश मुळे यांनी तर आभार माहिती संचालक दयानंद कांबळे यांनी मानले. कार्यक्रमाला ज्येष्ठ पत्रकार बाळ कुलकर्णी, धमेंद्र झोरे, भुपेंद्र गणवीर यांच्यासह विविध माध्यमातील पत्रकार, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे अधिकारी उपस्थित होते. तसेच राज्यातील जिल्हा माहिती कार्यालये आणि विविध पत्रकारिता संस्थांनी ऑनलाईन पध्दतीने व्याख्यानाचा लाभ घेतला.
ए.आय. अर्थात कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञानाने सर्व क्षेत्र व्यापले असून आता पत्रकारीतेतही ए. आय. मुळे अमुलाग्र बदल होत आहेत. त्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय विभागाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांचे नागपूर मध्ये झालेले व्याख्यान जळगाव नियोजन विभागाच्या कॉन्फरन्स हॉल मध्ये ऑनलाईन दाखविण्याची व्यवस्था जिल्हा माहिती कार्यालयाकडून करण्यात आली होती. तसेच प्रसार माध्यमाला या व्याख्यानाची लिंक दिली होती.
हे व्याख्यान जळगाव मधल्या अनेक पत्रकारांनी ऐकले. यावर काही जणांनी आपल्या प्रतिनिधिक प्रतिक्रिया दिल्या आहेत.
किशोर पाटील, जळगाव, ब्युरो, टी 9 मराठी
खूप छान व्याख्यान ऐकायला मिळालं… पत्रकारितेत कशा पद्धतीने बहुआयामी बदल होत आहेत.. आणि त्याला अनुसरून एआय किंवा इतर सर्व या गोष्टी महत्वपूर्ण आहे…त्या आत्मसात करण्याची गरज आहे….सरांचे मार्गदर्शन ऐकल्यावर…आपण खरच खूप मागे पडलो आहेत…आणि काळा सोबत राहण्यासाठी खूप मोलाचे मार्गदर्शन सरांकडून.. मिळालं…..पत्रकारितेतील आणि त्याला अनुरूप तंत्रज्ञानातील होणारे बदल.. यासाठी वेळोवेळी असे व्याख्यान आणि कार्यक्रमाची मोठी गरज आहे….
गौरव राणे, मीडिया कर्मी, जळगाव
एआय सोबत पत्रकारिता गेल्या दीड वर्षापासून अनुभवत आहे. जय महाराष्ट्र, टाईम्स नाऊ मराठी, news१८ लोकल सोबत काम करत असताना. ए आय नाव समोर आल हळू हळू काही सॉफ्टवेअरच्या माध्यमातून काही प्रमाणात काम शिकायला मिळाल. पण त्यापेक्षा ए आय खूप मोठ आहे…! हे समजून घेऊन पत्रकारिता पुढे न्यावी लागेल…! अनेक नविन बाबी समजल्यात अर्थात पूर्ण बघू नाही शकलो दिल्ली मधे असल्याने..! पण सुंदर उपक्रम…! धन्यवाद..! नव्या माहितीसाठी..!
मोहन दुबे रिपोर्टर News Nation/NEWS स्टेट महाराष्ट्र जळगाव
खरं तर आजकाल पत्रकारितेची व्याख्या दिवसेंदिवस बदलत आहे. अशातच आता AI पद्धती येऊ घातल्या आहे. नवीन तंत्रज्ञानासोबत पत्रकारिता करणे म्हणजे एक आव्हानच आहे. आणि तंत्रज्ञानाशी जुळवून घेत येणाऱ्या काळात पत्रकारिता कशी करावी हे या व्याख्यानातून अवगत झाले. असे व्याख्यान होणे फार महत्त्वाचे आहे. ज्यामुळे आताच्या नवीन पिढीतील तरुणांना आणि पत्रकारांना योग्य ते मार्गदर्शन मिळेल. आपल्यातील पत्रकार जिवंत ठेवायचा असेल तर तंत्रज्ञानाला सोबत घेऊन योग्य ती माहिती मिळवून पत्रकारिता केलेली बरी.
विजय पाठक, फ्री प्रेस जर्नल , जळगाव
आज तंत्रज्ञान क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर बदल होत आहेत आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता हा विषय सध्या मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहेत विविध क्षेत्रात याचा वापर केला जात आहे पत्रकारिता क्षेत्रात देखील या कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर व्हायला सुरुवात झाली. विषय तसा अत्यंत क्लिष्ट पण अत्यंत सोप्या पद्धतीने या कृत्रिम बुद्धिमत्तेचा पत्रकारितेत आपण कसा वापर करू शकू आणि ती सहज पत्रकारिता कशी होईल हे दाखवण्याचं काम आज ब्रिजेश सिंह साहेबांनी केलं आपल्या भाषणात त्यांनी सोप्या पद्धतीने उदाहरण देत हे सांगितलं एक चांगलं भाषण ऐकण्याचा आज आनंद मिळाला याच्यातून विषय कठीण नाही तर हा सोपा पण आहे हे लक्षात आलं धन्यवाद…!!
नरेंद्र पाटील, दै. पुढारी, प्रतिनिधी जळगाव
आज ए आय वर सरांचा मार्गदर्शन ऐकलं ऐकून खूप काही माहिती मिळाली महत्त्वाचे म्हणजे आपण जे उच्चार करतो त्यामधून गुगल सर्च आपली प्रतिमा बनवून आपल्याला पाहिजे तशी माहिती देते म्हणजे आपल्या उच्चारांवर किती चांगला भर द्यावा ही एक मैत्रीण त्यामधील समोर आलेली आहे दुसरी गोष्ट ए आय ची माहिती ती पण पडताळून घ्यावी जसं 300 वर्षांपूर्वी किंवा हजार वर्षांपूर्वी जी पुस्तक लिहून ठेवलेले असती गुगलवर दिसतात मात्र त्यांची सत्यता सुद्धा पडताळून पहावे याबद्दल सरांनी सांगितले तसेच आपल्या भाषेतून काही माहिती कशी ट्रान्सलेट करावी हीच उपयोग कसा करावा याबद्दल चांगलेच माहिती मिळाले अनेक टूल्स समजले व त्यांचा उपयोग कसा करावा याचे मार्गदर्शन झाले.
मनोज बारी, आवृत्ती प्रमुख, देशोन्नती, जळगाव
आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन जर्नालिझम या ब्रिजेश सिंह यांचे अप्रतिम व्याख्यानास अल्पकाळ पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे एकता आले. भविष्यकाळ हा AI चाच आहे असे एकंदरीत चित्र आहे व सर्व पत्रकारांनी हे आत्मसात करणे देखील गरजेचे आहे. पुढील व्याख्यानाला नक्कीच पूर्णवेळ उपस्थित राहू…धन्यवाद जिमाका जळगाव.