जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कला व मानव विद्या प्रशाळा आणि भारतीय मानव्य प्राच्यविद्या अध्ययन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने ‘भारतीय ज्ञान परंपरा’ या विषयावर एकदिवसीय दिशादर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेत प्रमुख वक्ते म्हणून दिल्ली वेब भारती संस्थेचे सल्लागार, साहित्यिक व चिंतक प्रा. प्रशांत पोळ यांनी उपस्थित राहून भारतीय ज्ञानपरंपरेची महती उलगडली.
प्रा. पोळ यांनी आपल्या बीजभाषणात सांगितले की, भारताला पुन्हा विश्वगुरू बनवायचे असल्यास प्राचीन ग्रंथांतील ज्ञानसंपदेवर प्रयोग करून त्याची पडताळणी करण्याची गरज आहे. भारताची ज्ञानपरंपरा ही केवळ धार्मिक नव्हे, तर वैज्ञानिकदृष्ट्याही समृद्ध आहे. त्यांनी ऋग्वेदामधील प्रकाशाच्या वेगाचा उल्लेख, समरांगण सूत्रधारांचा वास्तुशास्त्रावरील ग्रंथ, जल व्यवस्थापनातील अभ्यास, पराशर ऋषींचे हवामानविषयक अनुमान, महर्षी बोधारांचे पायथागोरसप्रमाणे सूत्र आणि वनस्पतींमध्ये चेतना शोधणारे जगदीशचंद्र बोस यांचे संशोधन आदी उदाहरणांद्वारे प्राचीन भारतातील ज्ञानाची महत्ता स्पष्ट केली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरु प्रा. व्ही.एल. माहेश्वरी होते. त्यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील भारतीय ज्ञान परंपरेच्या घटकावर प्रकाश टाकला. त्यांनी सांगितले की, अशा कार्यशाळांमुळे शिक्षकांमध्ये भारतीय ज्ञान परंपरेबद्दलचे गैरसमज दूर होतील आणि हे ज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवले जाईल.
प्रास्ताविकात राजेंद्र नन्नवरे यांनी कार्यशाळेच्या उद्दिष्टांवर भाष्य करत सांगितले की, भारताला जागतिक ज्ञान महासत्ता बनविण्यासाठी भारतीय परंपरेचे सखोल आकलन आवश्यक आहे.
या कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात ‘साहित्य, विज्ञान आणि तंत्रज्ञानाची गौरवशाली परंपरा’ या विषयावर प्रा. प्रशांत पोळ यांनी माहितीपूर्ण सादरीकरण केले. त्यांनी आत्मविश्वास असलेली नवपीढी घडवण्यासाठी भारतीय ज्ञान परंपरेची गरज अधोरेखित केली.
कार्यशाळेच्या समारोप सत्रात डॉ. भरतदादा अमळकर यांच्या उपस्थितीत खुले चर्चासत्र झाले. सूत्रसंचालन डॉ. वीणा महाजन यांनी केले तर आभार डॉ. तुषार रायसिंग यांनी मानले. कार्यशाळेला उत्तर महाराष्ट्रातील २२० शिक्षकांनी उपस्थित राहून सहभाग नोंदवला. कार्यशाळेच्या समाप्तीनंतर सर्व सहभागी शिक्षकांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमात विविध शिक्षणतज्ज्ञ, विद्यापीठ अधिकारी, अधिसभा सदस्य व प्राध्यापक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.



