एनडीए सरकार कधीही कोसळू शकते – मल्लिकार्जुन खरगे

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. तसेच एनडीए सरकार हे चुकून स्थापन झाले असून पुढील काळात हे सरकार कधीही कोसळू शकते, असे विधानही त्यांनी केले आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने २४० जागांवर विजय मिळविला. बहुमताचा २७२ हा आकडा त्यांना गाठता आला नाही. यासाठी त्यांना एनडीएतील मित्रपक्षांवर अवलंबून राहावे लागणार आहे.

मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, “एनडीए सरकार चुकून स्थापन झाले आहे. मोदींकडे बहुमत नाही. त्यांचे सरकार अल्पमतात आहे. त्यामुळे हे सरकार कधीही पडू शकते. आम्हाला तर वाटते सरकार पाच वर्ष चालावे, देश चांगल्या पद्धतीने चालला पाहीजे. देश बळकट करण्यासाठी आम्ही सर्व एकत्र येऊन काम करू. पण आमच्या पंतप्रधानांची सवय आहे की, जी गोष्ट व्यवस्थित सुरू आहे, ती त्यांच्या पचनी पडत नाही. आमच्या बाजूने आम्ही देशासाठी काम करत राहू. काँग्रेस अध्यक्ष खरगे यांनी पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या आघाडीच्या सरकारवर टीका करताच बिहारमधील जेडीयू पक्षाने याला उत्तर दिले आहे. जेडीयूने काँग्रेसच्या आघाडी सरकारमधील पंतप्रधानांच्या कामगिरीकडे लक्ष वळविले. तसेच खरगे जो आरोप करत आहेत, त्यावर त्यांनी आधी स्वतःकडे बघावे, असेही सूचित केले.

बिहारचे माजी मंत्री आणि विद्यमान विधानपरिषदेचे आमदार नीरज कुमार यांनी खरगेंच्या विधानावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. खरगे यांनी माजी पंतप्रधान पीव्ही नरसिंहराव आणि डॉ. मनमोहन सिंग यांच्या काळातील कामगिरीकडे आधी पाहावे, असा पलटवार नीरज कुमार यांनी केला. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने जितक्या जागा जिंकल्या आहेत, साधारण तितक्याच जागा काँग्रेसने जिंकल्या होत्या. जेव्हा कोणत्याही पक्षाला बहुमत नव्हते, तेव्हा निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या पीव्ही नरसिंहराव यांच्या नेतृत्वाखाली अल्पमताचे सरकार स्थापन केले गेले. तेही सरकार काँग्रेसने तडीस नेलेच होते.नरसिंहराव यांनी दोन वर्षांत छोट्या पक्षांमध्ये फूट पाडून काँग्रेस सरकारला बहुमतात आणले. खरगे यांना काँग्रेसचा हा इतिहास माहीत नाही का? असा सवाल उपस्थित करत नीरज कुमार पुढे म्हणाले की, काँग्रेस आता ९९ च्या फेऱ्यात अडकली आहे.

Protected Content