पंचायत समिती उपसभापतीपदी राष्ट्रवादीच्या सुनीता चौधरी

मुक्ताईनगर, पंकज कपले । येथील पंचायत समितीच्या उपसभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनीता चौधरी यांची निवड करण्यात आली आहे.

याबाबत वृत्त असे की, मुक्ताईनगर नगरपंचायतीतल्या खडसे समर्थक सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश घेतला असून चार जण वेटींगवर असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे नगरपंचायतीत शिवसेनेचे वर्चस्व निर्माण होणार असल्याचे संकेत आहेत. दरम्यान, या सर्व घडामोडी होत असतांना आज येथील पंचायत समितीच्या उपसभापतींची निवड करण्यात आली.

नगरपंचायतीचा अनुभव पाहता या निवडीत कोणताही दगाफटका नको म्हणून जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणीताई खडसे-खेवलकर यांनी उपसभापती निवड प्रक्रियेत लक्ष घातले. दरम्यान, या पदासाठी खडसे समर्थक गटाच्या सुनीता किशोर चौधरी यांची निवड करण्यात आली. ही निवड जाहीर होताच फटाक्यांची जोरदार आतषबाजी करून याचे स्वागत करण्यात आले.

निवड झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलतांना रोहिणीताई खडसे म्हणाल्या की, पंचायत समितीच्या माध्यमातून गोरगरिबांची सेवा करण्याची संधी सुनीताताई चौधरी यांना मिळाली असून त्या सभापतींच्या सोबत या पदावर अतिशय उत्कृष्टरित्या काम करतील. यासाठी उपसभापतींना त्यांनी शुभेच्छा दिल्या.

Protected Content