नागपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | गेल्या काही दिवसांपासून सातत्याने राष्ट्रवादीवर टीका करणारे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज या पक्षावर पुन्हा एकदा गंभीर आरोप केला आहे.
महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज देखील त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसवर टीकास्त्र सोडले आहे. ते म्हणाले की, गेल्या अडीच वर्षांपासून राष्ट्रवादी कॉंग्रेस महाराष्ट्रात भाजपला मदत करण्याचा राजकारण करत आहे. अडीच वर्षांपूर्वी ज्या मुद्द्यांवर सरकार बनलं होतं त्याचा उल्लंघन होत आहे.त्यामुळे आमच्या नेत्या सोनिया गांधी यांचा अपमान होत असून आम्ही ते सहन करणार नाही. पक्षश्रेष्ठींकडे राष्ट्रवादीच्या भूमिकेची आम्ही तक्रार केली आहे. पक्षश्रेष्ठी लवकरच त्या तक्रारीबद्दल निर्णय घेतील. येणार्या काही दिवसात त्याचे परिणाम दिसतील. आम्ही सत्तेत राहण्यासाठी सरकारमध्ये नाही, असं नाना पटोलेंनी म्हटलं आहे.
कॉंग्रेस सरकारमधून बाहेर पडण्याच्या मार्गावर आहे का? या प्रश्नावर बोलताना नाना पटोले यांनी म्हटलं की, येणार्या काही दिवसात तुम्हाला परिणाम दिसतीलच, आम्ही सत्तेत राहण्यासाठी सरकारमध्ये नाही. राज्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस हा कॉंग्रेसला संपविण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला.
कॉंग्रेसच्या शिबिराविषयी सांगताना ते म्हणाले की, कॉंग्रेसला देशाची चिंता आहे सध्या देशात राज्यघटना तसेच लोकशाही धोक्यात आली आहे. श्रीलंकेसारखी स्थिती होत आहे आणि त्यावरच कॉंग्रेसच्या चिंतन शिबिरामध्ये चर्चा झाली. येणार्या निवडणुकांमध्ये ५० टक्के तरुणांना संधी देऊ, एक परिवार एक तिकीट याची अंमलबजावणी महाराष्ट्रात आगामी निवडणुकीपासून होणार आहे. २ ऑक्टोबरपासून कॉंग्रेस देशभरात पदयात्रा काढणार आहे.
फडणवीसांच्या आरोपावर बोलताना नाना पटोले म्हणाले की, राज्यातील सरकारला जर बाबरी मशीद बोलतात, हे सरकार बाबरी मशीदीप्रमाणे पाडण्याची भाषा करतात. तेव्हा सत्तेसाठी त्यांची मानसिकता कशी आहे हे दिसून येत आहे. लोकशाहीतून निवडून आलेल्या सरकारबद्दल विवादित वक्तव्य करणे हा लोकशाहीचा खून आहे, असं ते म्हणाले.