जळगाव प्रतिनिधी । केंद्र सरकारने वाढविलेल्या इंधन आणि रासायनिक खतांची मोठ्याप्रमाणावर दरवाढ केले आहे. या दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. यांच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज दुपारी १२ वाजता पक्ष कार्यालयासमोर निषेध आंदोलन केले.
राष्ट्रवादी काँग्रेसने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, यंदाचा खरीप हंगामजवळ येऊन ठेपला आहे. पेरणीपुर्व शेती मशागतीच्या कामांनी वेग घेतला आहे. परंतु गेल्या वर्षापासून असलेली कोरोनाची टाळेबंदी, वकाळी पर्जन्य, वादळीमुळे शेतकऱ्यांच्या शेती मालाला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे उत्पन्न आणि खर्च यांचा ताळमेळ बसवताना शेतकरी वर्ग आर्थिकदृष्ट्या कमकुवत झाला आहे. यंदाचा खरिप हंगामजवळ आला असून त्यासाठी लागणारे खते, बियाणांच्या किंमती भाजपाच्या केंद्रशासनाने भरमसाठ दरवाढ केल्यामुळे शेतकरी मोठा अडचणीत सापडला आहे.
पूर्वी १ हजार १८५ ला मिळणारी डीएपीची गोणी आता १ हजार ९०० रुपयाला मिळणार आहे, १०.२६.२६ च्या 50 किलो गोणीची किंमत १ हजार १७५ होती ती आता १ हजार ७७५ ला मिळणार आहे. अशा प्रकारे सर्वच मिश्रखतांच्या किंमतीत भाजपाशासित केंद्र सरकारने १५ ते १७ टक्के दरवाढ केली आहे. हि दरवाढ शेतकरी बांधवांचे कंबरडे मोडणारी आहे. त्याचबरोबर आता पेरणीपुर्व मशागती सुरू असुन यासाठी ट्रॅक्टरला डिझेलची आवश्यकता असते. केंद्र शासनाने डिझेलच्या किंमतीत प्रचंड वाढ केली असल्या कारणाने शेती मशागतीचे ट्रॅक्टरचे दर सुद्धा वाढले आहेत. पेट्रोलच्या किंमतीने शंभरी पार केली आहे. पेट्रोल डिझेलची हि दरवाढ सामान्य जनतेच्या आवाक्या बाहेरची आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष रविंद्रभैय्या पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, वाल्मिक पाटील, रविंद्र नाना पाटील, मंगला पाटील, संदीप पाटील, अशोक पाटील, अमोल कोल्हे, अजय बढे, सुनिल माळी, अशोक लाडवंजारी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.