मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने कंबर कसली असून आगामी निवडणुकीत ६० पेक्षा जास्त जागा पक्ष लढवू शकतो अशी शक्यता पक्षातील वरिष्ठ नेत्याने व्यक्त केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व जागांवर सर्व्हे केला जाणार असून योग्य उमेदवाराला संधी देण्यात येणार असल्याचे पक्षाकडून सांगण्यात येत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी आगामी काळात प्रत्येकजण सर्व्हे करेल आणि आपले उमेदवार जास्तीत जास्त संख्येने कसे निवडून येतील अशी पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक गप्पांमध्ये प्रतिक्रिया दिली. तर प्रफुल्ल पटेल यांनी आगामी काळात आम्ही सर्वच २८८ जागांचे सर्व्हेही करणार असल्याचे म्हटले आहे. राज्यात सध्या महायुतीचे सरकार आहे आणि यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजप यासह छोट्या घटकपक्षांचे जागा वाटप लवकरच पार पडणार आहे. तत्पूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सर्वच २८८ जागांवर सर्व्हे करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय सर्व्हेमध्ये महायुतीत सर्वात चांगला रिपोर्ट ज्याचा असेल त्याला संधी देण्यात यावी अशी भूमिका घेतली आहे.