यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल येथील एसटी बसस्थानक परिसरात प्रवाशांना शासनमान्य दरात पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी महामंडळाने अधिकृत स्टॉल सुरू केले आहे. मात्र, संबंधित स्टॉलवर चढ्या दराने पाण्याच्या बाटलीची विक्री होत असल्याच्या तक्रारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आल्या.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आकाश चोपडे, शहराध्यक्ष योगेश पाटील, जिल्हा उपाध्यक्ष जुगल पाटील, ज्ञानेश्वर सुरवाडे, दिलीप हेगडे, चेतन सपकाळे, विशाल कोळी यांनी आगार प्रमुख दिलीप महाजन यांच्याकडे तक्रार नोंदवली. त्यांच्या म्हणण्यानुसार, शासनाने निश्चित केलेला दर १५ रुपये असताना, स्टॉल चालक अशोक दुधानी हा २० रुपयांना बाटली विकत होता.
तक्रारीनंतर, आगार प्रमुख महाजन यांनी तातडीने कारवाई करत स्टॉल चालकाला समक्ष बोलावले आणि त्याच्यावर १,००० रुपये दंड ठोठावला. तसेच, भविष्यात बाटली १५ रुपये दरानेच विक्री करावी व त्याची सूचना स्टॉलवर लावावी, असे आदेश देण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रवाशांसाठी केलेल्या या पुढाकाराचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.