यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल शहरात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी युवक काँग्रेस – शरद पवार गटाच्या वतीने एक महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत संघटन वाढ, युवकांचा सहभाग, तसेच निवडणुकांसाठी पक्षाच्या रणनीतीवर सखोल चर्चा करण्यात आली. युवकांमध्ये नवचैतन्य निर्माण करून स्थानिक राजकारणात त्यांचे नेतृत्व घडविण्याच्या उद्देशाने ही बैठक भरविण्यात आली.
दिनांक २५ जुलै रोजी यावल येथील फ्रुट सेल सोसायटीच्या सभागृहात झालेल्या या बैठकीस युवकांचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष विश्वजित पाटील आणि प्रदेश सरचिटणीस रमेश पाटील यांनी अध्यक्षस्थानी राहून मार्गदर्शन केले. नगर परिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका अशा विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक अत्यंत मोलाची ठरली. बैठकीत स्थानिक पातळीवरील संघटना मजबुत करण्यासाठी कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधण्यात आला.

पक्षाचे यावल तालुका अध्यक्ष प्रा. मुकेश येवले, ज्येष्ठ नेते विजय पाटील, आदिवासी सेलचे एम. बी. तडवी यांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी युवकांना संघटन बळकट करण्याचे महत्व पटवून दिले. “युवकांनी पुढे येऊन समाजातील प्रश्नांवर आवाज उठवावा आणि स्वतः नेतृत्व घडवावे,” असे आवाहन यावेळी करण्यात आले. बैठकीत गावपातळीपासून जिल्हापातळीपर्यंत संघटनात्मक बांधणीसाठी नव्याने रणनीती आखण्यावर भर देण्यात आला.
या बैठकीला तालुक्यातील विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये पवन पाटील, नानाजी पाटील, ललित पाटील, किरण पाटील, किशोर माळी, प्रसन्न पाटील, अरुण लोखंडे, रोहन राठोड, पवन महाजन, ईश्वर पाटील, गणेश पवार, मुकेश दामोदर, प्रदीप पाटील, बापू जासूद, नरेंद्र पाटील, हाजी युसुफ शेठ, गिरीश पाटील, शेख सद्दाम, मोहसीन खान, शेख युसुफ, संतोष तायडे, शेख वजीर शेख सुपडू, जाहीद कुरेशी, आबीद कच्ची, सहदेव पाटील, डॅनिश पिंजारी, तुषार येवले, शरीफ तडवी, राहुल गजरे आणि मिलिंद सोनवणे यांचा समावेश होता.
बैठकीच्या शेवटी युवकांनी एकत्र येऊन स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी शरद पवार गटाची ताकद वाढविण्याचा निर्धार केला. आगामी निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य आणि जोश निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले.



