राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ‘या’ मतदारसंघातून घड्याळ चिन्ह वापरता येणार नाही

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | महाराष्ट्रातील महायुतीसोबत असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला लक्षद्वीप मतदारसंघात त्यांचे अधिकृत निवडणूक चिन्ह घडयाळ हे अधिकृत चिन्ह वापरता येणार नाही आहे. गेल्या वर्षी राष्ट्रवादीत फूट पडून शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट निर्माण झाले होते. परंतू केंद्रीय निवडणूक आयोगाने अजित पवार यांच्या गटाला राष्ट्रवादी काँग्रेस असे नाव आणि त्यांचे मूळ चिन्ह घडयाळ ही दिले. याव्यतिरिक्त शरद पवार यांच्या गटाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष असे नाव देऊन तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह देण्यात आले. पण आता या चिन्हाच्या वादाला नवे वळण प्राप्त झाले आहे.

देशात पहिल्या टप्प्याचे मतदान १९ एप्रिल रोजी होणार आहे. लक्षद्वीपमध्ये ही पहिल्या टप्प्यात मतदान होणार आहे. या ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे युसुफ टीपी हे उमेदवार आहे. परंतू चिन्ह आदेश परिच्छेद १० नुसार निवडणुकांची अधिसूचना निघाल्यानंतर जास्तीत जास्त तिसऱ्या दिवशी कॉमन चिन्हाचा अर्ज ग्राह्य धरला जातो. अजित पवार गटाने २४ मार्च रोजी अर्ज केला आणि पहिल्या टप्प्यातील निवडणुकीची अधिसूचना 20 मार्चला निघाली. एक दिवस उशीर झाल्याने आता पहिल्या टप्प्यात अजित पवारांना घड्याळ मिळणार नाही. लक्षद्वीप पहिल्या टप्प्यात निवडणुका होत असल्याने तिथे घड्याळ चिन्ह मिळणार नाही. त्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाला दुसऱ्या ते सातव्या टप्प्यापर्यंत महाराष्ट्र आणि नागालँडमध्ये निवडणूकीच्या मतदान प्रक्रियेसाठी घड्याळ चिन्ह वापरता येणार आहे. पण पहिल्या टप्प्यात लक्षद्वीपमध्ये वापरता येणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट महाराष्ट्राव्यतिरिक्त नागालंड आणि लक्षद्वीपमध्ये लोकसभा निवडणूकीसाठी उमेदवार देणार आहे.

Protected Content