मुंबई : राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना १३ दिवसांची ईडीच्या कोठडीनंतर आता त्यांना मुंबईच्या पीएमएलए कोर्टानं १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
दाऊद इब्राहिमशी कथित स्वरुपात आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी नवाब मलिक यांना २३ फेब्रुवारी रोजी ईडीनं अटक केली होती. त्यानंतर त्यांना कोर्टानं १३ दिवसांची ईडीची कोठडी सुनावली होती. आज ही कोठडी संपत असल्यानं त्यांना पुन्हा मुंबईतील विशेष पीएमएलए कोर्टात हजर करण्यात आलं. तेव्हा कोर्टानं त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळं मलिकांची रवानगी आता ऑर्थर रोड तुरुंगात होणार आहे.
नवाब मलिकांच्या वकिलांनी मलिकांच्या अटक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं असून न्यायालयीन कोठडीला विरोध दर्शवला. मुळातच ईडीची कारवाई बेकायदा असल्याचं सांगत मुंबई हायकोर्टातही ईडीच्या कारवाईला आव्हान देण्यात आलं आहे. दुपारी चार वाजता यावर हायकोर्टात सुनावणी होणार आहे. त्यामुळं सत्र न्यायालयात जामीन अर्ज सादर करण्यात आला नाही. पण तुर्तास २१ मार्चपर्यंत नवाब मलिक ऑर्थर रोड तुरुंगात असणार आहे.